हडपीड-कोळोशीत चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: September 24, 2014 00:01 IST2014-09-23T21:49:33+5:302014-09-24T00:01:01+5:30

दोन शाळा फोडल्या : २२ हजार ४५४ रोख रक्कम लांबविली, दोन्ही गावात खळबळ

Hoodpid: The thunderbolt of thieves | हडपीड-कोळोशीत चोरट्यांचा धुमाकूळ

हडपीड-कोळोशीत चोरट्यांचा धुमाकूळ

शिरगांव : देवगड-नांदगांव मार्गावर देवगड तालुक्यातील माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपीड व कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी-हडपीड या दोन्ही शाळांच्या दरवाजांचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी २२ हजार ४५४ रुपयांची रोख रक्कम लांबविली. ही घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेने दोन्ही गावात खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपीड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी-हडपीड या दोन्ही शाळा देवगड व कणकवली तालुक्याच्या हद्दीवर देवगड-नांदगांव मार्गावर आहेत. दोन्ही शाळांच्या आजूबाजूला लोकवस्ती नसल्याने अज्ञात चोरट्यांनी दोन्ही शाळांतील रोख रक्कम लांबविली व सामान अस्ताव्यस्त करून टाकले आहे. माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपीड या शाळेतील मुख्याध्यापक परमानंद सावंत व शिपाई अनंत हडपीडकर हे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास शाळा बंद करून घरी निघून गेले. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेचे शिपाई अनंत हडपीडकर हे शाळा उघडण्यासाठी शाळेत आले असता दर्शनी बाजूच्या संस्था कक्ष व मुख्याध्यापक कक्ष या दोन्ही कक्षांच्या खोल्यांची शाळा बंद करताना लावलेली कुलुपे गायब असल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्याने मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्या विभावरी खोत, सरपंच शैलजा गुरव, पोलीस पाटील दिलीप राणे, शाळा समिती सदस्य दाजी राणे, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, चोरट्यांनी या शाळेच्या समोरच असलेल्या कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्य दरवाजाची कडी कापून शाळेत प्रवेश केला. मुख्याध्यापक यांच्या कपाटातील रोख रक्कम ८०० रुपये लांबविले. तर रेकॉर्ड रुममधील दोन्ही कपाटांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. या दोन्ही शाळांच्या चोरीप्रकरणात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कुलुपेच चोरून नेली आहेत. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक परमानंद सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात माहिती दिली असून देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एफ. पाटील, पोलीस शिपाई कॅलिस डिसोजा यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पहाणी करून पंचनामा केला.
कोळोशीचे पोलीस पाटील संजय गोरुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी कासार्डे पोलीस दूरक्षेत्रात माहिती दिली. त्यानुसार कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्माराम गोसावी यांनी पंचनामा केला आहे. देवगड पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

पोलिसांसमोर आव्हान
प्राथमिक तपासात चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. त्यामुळे हे चोरटे निष्णात असावे असा अंदाज आहे.
कपाटांच्या काचा अथवा दरवाजांवर किंवा विस्कटलेल्या वस्तूंवरही हाताचे किंवा बोटांचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे या चोरीचा किंवा चोरट्यांचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोन्ही गावात शाळांमध्ये रात्री घडलेल्या या घटनेमुळे भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Hoodpid: The thunderbolt of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.