एकरूपता जपणारा उत्सव
By Admin | Updated: September 5, 2014 00:17 IST2014-09-04T23:06:04+5:302014-09-05T00:17:21+5:30
गणेशोत्सवाचा आनंद तोच : विविध प्रांतातील चालीरिती वेगळ्या

एकरूपता जपणारा उत्सव
प्रसन्न राणे -सावंतवाडी -समाजाला एकत्र आणण्याकरिता गणपतीच्या उत्सवाला बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक स्वरुप दिले. या उत्सवाला समाजाचाही इतका मोठा प्रतिसाद लाभला आहे की, कोकणाप्रमाणे राज्याच्या अन्य ठिकाणीही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येक प्रांताच्या विविध प्रथांमध्ये व नैवेद्यांच्या प्रकारांमध्ये वैविध्यता असली तरीही गणेश उत्सवाचा आनंद हा सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरत आहे.
गणेशाचा नैवेद्य म्हणजे कोकणात उकडीचे मोदक, करंज्या, पंचखाद्य, तांदळाची खीर वगैरे गणेश चतुर्थीत केले जातात. परंतु बहुभाविक संस्कृती असलेल्या भारतातील बहुसंख्य प्रांतात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वेंगुर्लेतील मूळचे व कामानिमित्त दिल्ली, बिहार, कोलकत्ता, बेंगलोर, केरळ, तसेच परदेशातही असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव इतर राज्यात कशा पध्दतीने साजरा केला जातो आणि बाप्पाच्या नैवेद्याला कोणते पदार्थ बनविले जातात, याबाबत प्रांतानुसार वेगवेगळी प्रचिती येते.
कोकणात गणपती हा कुटुंबवत्सल मानला जातो. त्यामुळे रिध्दी- सिध्दीही सोबत असतात. परंतु केरळ प्रांतात गणपती हा ब्रम्हचारी, तर कार्तिकस्वामी हा कुटुंबवत्सल देव मानला जातो.
खरे तर, केरळचा नववर्ष दिन (ओणम) हा महत्त्वाचा सण आहे. त्यांच्याकडे अधिक महिना वगैरे पद्धत नाही. नववर्षाच्या चौथ्या दिवशी गणपती आणून त्याचे पाच दिवसांसाठी पूजन केले जाते. त्याला पायसम् हा नैवेद्य दाखविला जातो. आपल्याकडे ऋषिपंचमीला निरनिराळ्या भाज्या घालून जी भाजी केली जाते, तशीच वेगवेगळ्या भाज्या अवियल ही एक भाजी केली जाते. तर पायसम हा खिरीचाच एक प्रकार आहे.
कलकत्ता, चेन्नई, दिल्ली, लंडन अशा विविध ठिकाणी गणपतीचे घरोघरी पूजन होत नाही. परंतु या भागात स्थायिक झालेले महाराष्ट्रीय लोक महाराष्ट्र मंडळात अगदी जल्लोषात एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सवाचा आनंद लुटतात. पारंपरिक फुगड्या, आरत्या, नाटक, संगीत अशाने सांस्कृतिक स्वरूप या उत्सवाला आलेले असते. त्यातही शक्य असल्यास व गणपतीची मूर्ती उपलब्ध झाल्यास अगदी शनिवार-रविवार अशा सुट्टीच्या दिवशीही हौशी लोक गणपतीचे घरीच पूजन करायला प्राधान्य देतात. उत्तर प्रदेशात गणेशोत्सव साजरा केला जात नाही. परंतु आपल्याकडील मोदकाला तेथील लोक ‘मिठे मोमो’ असे म्हणतात.
विविध प्रांतातील रेसीपिज व प्रामुख्याने गणेशोत्सवात भारतातील विविध प्रांतांमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव व गणेशाला दाखविले जाणारे प्रांतवार नैवेद्य यात जरी वेगळेपणा असला तरीही यातून जनसामान्यांना मिळणारा आनंद मात्र, तोच आहे. सर्वांमधील एकी जपून त्यांना सन्मार्ग दाखविणाराच सण सर्वांत मोठा मानला जातो. आणि गणेशाचा हा उत्सवही विविध प्रांतातील एकता टिकविणारा बनलेला आहे.
कोकणातील पद्धत लोकप्रिय
महाराष्ट्रात केरळवासीय नोकरीनिमित्त आले आहेत, त्यांना कोकणातील पद्धत जास्त आवडल्याने ते महाराष्ट्रीयन पद्धतीनेच गणपतीचे पूजन करू लागले आहेत व पारंपरिक रेसीपिज करू लागल्याचे दिसून येत आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक येथे महाराष्ट्राप्रमाणेच मूर्ती आणून पाच व दहा दिवस असे पूजन केले जाते. मोदकाऐवजी डाळीचे सारण असलेले कडबू जे तांदळाची उकड काढून किं वा कणिकाचे तळून अशा पद्धतीने केले जातात व हा नैवेद्य दाखविला जातो. म्हैसूर बेंगलोरमध्ये खास मूर्ती आणतात. पण मेंगलोरमध्ये घरच्याच गणपतीचे पूजन केले जाते. येथे हरितालिकेप्रमाणेच गौरीचेही पूजन होते. परंतु उपवास केला जात नाही. याठिकाणी मात्र बाप्पाला इडली-सांबार आणि चटणी असा नैवेद्य असतो. परंतु नैवेद्यातील इडली नेहमीपेक्षा वेगळी असते. म्हणजे इडली पिठाचीच, परंतु गोल आकारात नसून एका विशिष्ट आकाराच्या पानाचा द्रोण करून त्यात ते पीठ ओतले जाते किं वा अगदीच ते पान नाही मिळाले, तर उभट ग्लासमध्ये हे सारण ओतून इडली तयार केली जाते. या नैवेद्याला ते कडबू असे म्हणतात.