होमिओपॅथी डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक
By Admin | Updated: December 26, 2014 00:51 IST2014-12-25T22:09:22+5:302014-12-26T00:51:02+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनातून वेधले लक्ष

होमिओपॅथी डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक
सिंधुदुर्गनगरी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना उद्धट व अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा होमिओपॅथिक संघटनेने जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांची भेट घेत लक्ष वेधले. यापुढे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळेल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद काळसेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा होमिओपॅथी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे डॉ. प्रवीण सावंत, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, डॉ. अरुण गोडकर, डॉ. दीपक ठाकूर, डॉ. गिरीश बोर्डवेकर, आदी पदाधिकारी आणि सुमारे ३० होमिओपॅथिक डॉक्टर्स उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. काळसेकर म्हणाले की, सिंधुदुर्गात प्रामुख्याने एमबीबीएस डॉक्टरची संख्या ८४ एवढी आहे. मात्र, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक अशा आयुष डॉक्टरांची संख्या ५५० एवढी आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला हे डॉक्टर्स रुग्णसेवा देत असताना अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी त्यांना उद्धट व अपमानास्पद वागणूक देत असल्याने या सर्व डॉक्टर्सनी आक्रमक पवित्रा घेतला.
एखाद्या दारू दुकानावर धाड टाकल्याप्रमाणे हे अधिकारी दवाखान्यात तपासणीसाठी धाड टाकतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देतात. त्यांची दहशत व दादागिरीची भाषा असते. रुग्णांसमोरच हे प्रकार घडत असल्याने रुग्णांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतात आणि त्याचा वैद्यकीय व्यवसायावरही मोठा परिणाम होतो.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे या अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यास कोणताही अडथळा डॉक्टर्स करीत नाहीत. पूर्णपणे सहकार्य त्यांना करण्यात येते. मात्र, त्यांनी ही तपासणी करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना द्यावी. त्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे डॉ. काळसेकर यांनी सांगितले.
याबाबत अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील व सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिल्याचेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)