‘असर’च्या अहवालाची होळी
By Admin | Updated: February 2, 2015 00:07 IST2015-02-01T21:36:16+5:302015-02-02T00:07:26+5:30
प्राथमिक शिक्षक समितीची निदर्शने : ‘प्रथम’ संस्था शिक्षकांची बदनामी करत असल्याचा आरोप

‘असर’च्या अहवालाची होळी
सिंधुदुर्गनगरी : प्रायोगिक शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि शिक्षकांची बदनामी करणाऱ्या ‘प्रथम’ या संस्थेच्या ‘असर - २०१४’ या अहवालाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने निषेध व्यक्त करीत संबंधित अहवालाची होळी केली. ‘प्रथम’ या संस्थेविरोधात जोरदार निदर्शने केली.महाराष्ट्रातील पहिली ते आठवीचा शैक्षणिक दर्जा अत्यंत सुमार असून, शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याबाबत ‘प्रथम’ या संस्थेने आपला असर अहवाल शासनाला दिला आहे. पाचवीतील ४६.५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचे वाचन करता येत नाही. आठवीतील ३२.९ टक्के विद्यार्थी भागाकाराचे गणित सोडवू शकत नाहीत. २२.८ टक्के विद्यार्थी छोटे-छोटे इंग्रजी शब्द वाचू शकत नाहीत, असे अहवालात निष्कर्ष काढले आहेत. या अहवालामुळे महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, प्राथमिक शिक्षक टीकेचे लक्ष बनले आहेत.
पालकांचे लक्ष खासगी शिक्षणाकडे वळावे आणि शिक्षणाच्या खासगीकरणासाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे, या दूषित हेतूने ‘प्रथम’ संस्थेने ‘असर - २०१४’ हा अहवाल दिला आहे. प्रथम संस्थेने एकूण शाळांपैकी केवळ १ टक्का शाळांच्या सर्वेक्षणावरून निष्कर्ष काढले आहेत. ज्यांनी सर्वेक्षण केले, त्यांचा शिक्षण क्षेत्राशी काडीमात्र संबंध नाही.
प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलेले नाही. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावत असून, तो सुधारण्यासाठी आपली संस्था वाचन, लेखन व गणित विकास प्रकल्प राबवत असल्याचे दाखवून परदेशातील संस्थांकडून मिळणारा आर्थिक निधी हडप करण्यासाठी अशाप्रकारचे अहवाल तयार करीत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे.
याबाबत शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, कोकण विभागप्रमुख नामदेव जांभवडेकर, संतोष पाताडे, नंदकुमार राणे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे एकत्र येत ‘प्रथमद संस्थेच्या असर-२०१४ या अहवालाची जाळून होळी केली. संबंधित संस्थेचा निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)