होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

By Admin | Updated: February 2, 2015 23:51 IST2015-02-02T22:25:17+5:302015-02-02T23:51:39+5:30

वाहतूक कोेंडी : व्यापाऱ्यांना बसण्यास जागा नाही

Hodavade market problems | होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत

रामचंद्र कुडाळकर- तळवडे -वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे बाजारपेठ ही सावंतवाडी संस्थान काळापासून सुरू झालेली बाजारपेठ आहे. दर मंगळवारी येथे आठवडा बाजार भरतो; परंतु आठवडा बाजारादिवशी होणारी वाहतूक कोंडी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता, ग्राहकांच्या सोयीसुविधांची वानवा आदी अनेक समस्यांमुळे होडावडे बाजारपेठ समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. आठवडा बाजार म्हटला की, ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदी-विक्रीचा, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा दिवस.
संस्थानकाळापासून अस्तित्वात असलेल्या होडावडा बाजारपेठेत होडावडे दशक्रोशीतील लोक खरेदी-विक्री तसेच शेतीतून
उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी येतात. आठवडा बाजारामुळे ग्रामीण भागातील लोकांना माफक दरात गृहोपयोगी वस्तू खरेदी करता येतात. होडावडे बाजारपेठ ही जरी लहान असली, तरी मंगळवारच्या आठवडा बाजारामुळे या गावाचे आणि ग्रामपंचायतीचे महत्त्व वाढले आहे. मातोंड, पेंडुर, नेमळे, वजराठ, तळवडे, तुळस, पाल, अणसूर-पाल, निरवडे, न्हावेली तसेच कोल्हापूर, बेळगाव आदी भागांतूनही लोक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात.

वाहतूक कोंडी
होडावडे आठवडा बाजारात दशक्रोशीसह परगावातूनही लोक येत असल्यामुळे येथे व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांची गर्दी होते. परंतु जागेअभावी दुकानदारांची अर्धिअधिक दुकाने रस्त्यावर येत असल्याने आठवडा बाजारादिवशी येथे वाहतूक कोंडीही नेहमीचीच समस्या झाली आहे. त्यातच ही बाजारपेठ सावंतवाडी-वेंगुर्ले रस्त्यानजीकच असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचीही त्यात भर पडते. याचा त्रास ग्राहकांना आणि वाहनचालकांनाही सहन करावा लागतो. यासाठी विक्रेत्यांना ठराविक जागेत दुकान थाटण्यासाठी निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे.


आठवडा बाजार वगळता ग्राहकांची वानवा
होडावडे बाजारपेठेत काळानुरूप बदल होत असला, तरी मंगळवारचा आठवडा बाजार सोडून इतर दिवशी येथे ग्राहकांचे प्रमाण फारच कमी असते. याचा फटका दुकानदार, व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग वाढविण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासकीय योजनांचा फायदा घेऊन तसेच ग्रामपंचायत आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे.

जागेची अनुपलब्धता
होडावडे बाजारपेठेत व्यापाऱ्यांना बसण्यासाठी जागेची अनुपलब्धता भासत आहे. त्यामुळे आठवडा बाजारादिवशी येणारे व्यापारी, दुकानदार आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटतात. यातून काहीवेळा दुकानदारांमध्ये आपापसात वाद-भांडणेही उद्भवतात. याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे जागेच्या व्यवस्थापनाबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन गरजेचे
आठवडा बाजाराला येणारे भाजी तसेच अन्य विक्रे ते कचरा तसाच टाकून जातात. त्यामुळे स्वच्छता निर्माण होते. यासाठी बाजारादिवशी सायंकाळी सर्व विक्रेत्यांनी आपापला कचरा कचराकुं डीत टाकण्याची सक्ती करणे आवश्यक आहे.

Web Title: Hodavade market problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.