इतिहासाबाबत एकमत होणार नाही
By Admin | Updated: February 2, 2015 00:02 IST2015-02-01T23:09:32+5:302015-02-02T00:02:32+5:30
सदानंद मोरेंचे आवाहन : कणकवलीत इतिहास संशोधक मनोहर कदम स्मृती प्रबोधन महोत्सव

इतिहासाबाबत एकमत होणार नाही
कणकवली : इतिहासाच्या बाबतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. तो कमी करीत नाही आणि वर्तमानातही उतरत नाही, तोपर्यंत आपली चळवळ तशीच भूतकाळात रममाण होईल. इतिहासाबाबत कधीही एकमत होणार नाही. त्यामुळे ज्यांना चळवळ करायची आहे, त्यांनी इतिहासाकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयाच्या पटांगणावर रविवारी आयोजित इतिहास संशोधक मनोहर कदम स्मृती प्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी डॉ. बाबा आढाव, माजी आमदार काँ. नरसय्या आडम, साहित्यिक राजन गवस, श्रमिक मुक्तीदलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, नाटककार संजय पवार, पत्रकार सचिन परब, प्रतिमा जोशी, जीवराज सावंत, प्रा. विनोदसिंह पाटील, काँ. किशोर जाधव, मधुकर मातोंडकर, सुरेखा दळवी, महाराष्ट्र तेलगू मंच अध्यक्ष जगनबाबू गंजी, अंकुश कदम आदी उपस्थित होते. सचिन परब, प्रतिमा जोशी, जीवराज सावंत, किशोर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अंकुश कदम यांनी केले. सत्यशोधक मनोहर कदम, प्रागतिक समाज विज्ञान संशोधन संस्थेचा प्रारंभ यावेळी करण्यात आला. तसेच मनोहर कदम स्मृती ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)
डॉ. बाबा आढाव : जातियतेच्या तसेच धर्माच्या मनोऱ्यावर देश उभा राहतो आहे. याचे भान ठेऊन परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्र्त्यानी काम केले पाहिजे. परिवर्तनवाद्यांनी जनतेसमोर सांस्कृतिक पातळीवर ठोस असा कार्यक्रम ठेवला पाहिजे. तरच प्रतिगामी चळवळींना शह बसेल. भारतातील जातीयव्यवस्था, लिंगभेद सहजासहजी नष्ट होणार नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करताना समतेचा वृक्ष एकाएकी उगवणार नाही. माणसाला मारता येईल. मात्र, त्याच्या विचारांना मारता येणार नाही. त्यामुळे कितीही आक्रमणे झाली तरी न डगमगता समतेचा लढा सुरुच ठेवला पाहिजे. मनोहर कदम यांनी भारतीय कामगार चळवळीला एक नवा आयाम आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे कार्य श्रेष्ठ होते. मालवणी भाषेत हृदयातील भावना व्यक्त करता येतात.हे मनोहर कदम यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरु होते. या प्रबोधन महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला. तर ती खरी त्यांना आदरांजली ठरेल.
नरसय्या आडाम : देशात परिवर्तन होण्यासाठी ागतसिंग, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आत्मसात करणारे तसेच जीवावर उदार होणारे लोक परिवर्तनवादी लढ्यात सहभागी झाले पाहिजेत. ९३ टक्के असंघटित कामगार असून त्यांना केवळ एक वेळचे जेवण मिळावे अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. डाव्या चळवळीतील नेते वगळले तर इतर सर्व पक्षातील नेत्यांच्या घरात काळा पैसा आहे. तो बाहेर काढला तर देशातील गोरगरीब जनतेचे सर्व प्रश्न एका झटक्यात सुटतील.
सगळीकडे भ्रष्टाचा रुजला असून तो नष्ट होत नाही तोपर्यंत विधीमंडळात गरीबांसाठी लढणारे नेते जाणार नाहीत. त्यामुळे सर्वांनी समान कार्यक्रम हाती घेऊन संघटित झाले पाहिजे. मुंबईच्या जडणघडणीत तेलगू समाजाचे असलेले योगदान संशोधनाअंती मनोहर कदम यांनी शोधून काढले. त्यावर आधारित पुस्तक लिहिले. त्यांचे हे कार्य महान आहे. ते पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
खोटा इतिहास ?
डॉ. सदानंद मोरे: सध्याच्या काळात इतिहास ही एक रणभूमी झाली आहे. सर्वसमाज घटकांना मान्य असलेले शिवाजी महाराज हे एक व्यक्तिमत्त्व आहे. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जातीजमातींना मान्य होईल असे शिवचरित्र अद्याप लिहिले गेले नाही.
इतिहास संशोधन जातीग्रस्त झाले आहे. दुसऱ्या जातीच्या लोकांनी जर काही चांगले केले असेल तर ते मान्य करायचे नाही. त्याचबरोबर आपल्या जातीच्या लोकांकडून काही प्रमाद घडला असल तर तो मान्य करायचा नाही. अशी स्थिती सध्या आहे.
खोट्या इतिहासाचा प्रतिवाद खोट्या इतिहासाने करायचा नाही. यावर सर्वांचे एकमत झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी काही जमातींनी अन्य जमातींवर कमालीचे अन्याय केले असतील ते कोणीही नाकारत नाही. पण आज जे चालल आहे त्याकडे लक्ष द्या.
वर्तमानात राहिलं तरच परिवर्तनवादी चळवळ यशस्वी होऊ शकेल, याची दखल घ्या.