इतिवृत्तातील ठराव गायब

By Admin | Updated: July 10, 2015 22:35 IST2015-07-10T22:35:33+5:302015-07-10T22:35:33+5:30

कुडाळ पंचायत समिती सभा : नारकर, बंगे यांच्यात उडाली खडाजंगी

Historical resolutions disappeared | इतिवृत्तातील ठराव गायब

इतिवृत्तातील ठराव गायब

कुडाळ : मासिक सभेच्या इतिवृत्तातील मांडलेले ठराव गायब होतात. यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यापेक्षा याबाबतीत गटविकास अधिकाऱ्यांवरच कारवाई करा, अशी मागणी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करताच दीपक नारकर व अतुल बंगे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा कुडाळ पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी पार पडली. यावेळी सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती आर. के. सावंत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पंचायत समिती सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पंचायत समिती सदस्य नारकर व बोभाटे म्हणाले की, पंचायत समितीच्या बैठकीत मांडलेले ठराव, विषय इतिवृत्तातून गायब होतात. याला कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. या मागणीला पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी विरोध करत कर्मचारी भर उन्हाळ्यात कार्यालयात कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसताना कार्यालयात बसतात. याठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असताना हे सर्व सहन करीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना का दोषी धरता? त्यापेक्षा गटविकास अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी करा, अशी भूमिका बंगे घेतली. यावरून नारकर व बंगे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
या सभेत नैसर्गिक आपत्तीग्रस्त, आंबा, काजू नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करा, वेळ लावू नका, निधी परत परतून जाता नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. तालुक्यात काही ठिकाणी विद्युत खांब खराब होऊन धोकादायक स्थितीत आहेत. ते खांब बदलावेत, अशा विविध सूचना यावेळी पंचायत समिती सदस्यांनी केल्या.
माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक शालेय पोषण आहाराचे नोंद रजिस्टर ठेवत नाही. त्यामुळे ते पोषण आहार देतात की नाही, याबाबत अतुल बंगे यांनी मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार दिली.
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या लवकरात लवकर सोडवा, अशी मागणी यावेळी दीपक नारकर यांनी केली. (प्रतिनिधी)

भूसंपादन न सांगता केले ; कारवाई करा
कुडाळ तालुक्यातील कडावल घोडगे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हे तेथील भूधारकांना विचारात न घेता, न कळविता केले असून भूधारकांना मोबदलाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Web Title: Historical resolutions disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.