भारतात धावणार अतिवेगवान रेल्वे
By Admin | Updated: August 21, 2016 23:08 IST2016-08-21T22:55:44+5:302016-08-21T23:08:30+5:30
सुरेश प्रभू : रेल्वे संशोधन केंद्राचे रत्नागिरीत उद्घाटन

भारतात धावणार अतिवेगवान रेल्वे
रत्नागिरी : रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मायग्रोव्ह या जगातील सर्वांत मोठ्या कंपनीशी केंद्र सरकारची लवकरच नवी दिल्लीत चर्चा होणार आहे. या तंत्राद्वारे भारतीय रेल्वेतही क्रांती घडविता येईल व शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटांत पार करता येईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात रविवारी दुपारी १ वाजता रेल्वे संशोधन केंद्राचे मंत्री प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता, विद्यापीठाचे रजिस्ट्रार एम. ए. खान, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आदी उपस्थित होते.
प्रभू म्हणाले, दीडशे वर्षांपासून रेल्वेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान यापुढे कालबाह्य ठरणार आहे. सर्वाधिक वेगवान रेल्वेचा प्रयोग चीनने याआधी केला होता. मात्र आता त्यापेक्षाही वेगवान म्हणजेच ५५० ते ६०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेतही वापरून वेगाबाबत क्रांती घडवून आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संबंधित कंपनीच्या
प्रतिनिधींना २ सप्टेंबरला दिल्लीत चर्चेसाठी बोलावले आहे.
कोकण रेल्वे आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहयोगातून रेल्वेने सुरू केलेल्या ‘रेल्वे अभियांत्रिकी संशोधन केंद्रा’चे झालेले उद्घाटन हे भारतीय रेल्वेतील एक नवे पर्व आहे. या केंद्रात कोकणातील अनेक युवक, युवतींना रेल्वेशी निगडीत अनेक विषयांवरील संशोधन करण्याचे कोर्स सुरू पूर्ण करता येतील. त्यांच्यासाठी रेल्वेतच नोकरीची संधीही मिळू शकेल. त्याचा फायदा कोकणवासीयांनी घ्यावा, असे ते म्हणाले. रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी देशातील ६७९ विद्यापीठांमधून मुंबई विद्यापीठाची केलेली निवड हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रेल्वे प्राधिकरणाच्या मदतीने रेल्वे संदर्भातील व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ अशा सर्व प्रकारच्या गरजांवर आधारित सर्व प्रकारचे अभ्यासक्रम या संशोधन केंद्रात सुरू करण्यात येतील. या कार्यक्रमापूर्वी मंत्री प्रभू यांच्या हस्ते संशोधन केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
रेल्वेचे विद्यापीठ
देशात रेल्वेचे स्वत:चे अभियांत्रिकी संशोधन विद्यापीठ हवे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रथम संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक ती तयारी रेल्वेकडून केली जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत:चे विद्यापीठ येत्या काही कालावधीत स्थापन होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले.
रेल्वे-विद्यापीठ समन्वयाचा अभाव
रेल्वेच्या संशोधन केंद्राच्या कार्यक्रमात कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन संजय गुप्ता हे व्यासपीठासमोरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेत बसले होते. मात्र, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांना नंतर व्यासपीठावर बोलावले. रेल्वेच्या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे चेअरमन व्यासपीठावर नसणे ही अयोग्य बाब होती. त्यामुळे कार्यक्रमाबाबत रेल्वे व विद्यापीठ यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले.....
४ समुद्राची सर्वाधिक माहिती असलेल्या मच्छिमारांच्या ज्ञानाचा ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ निर्माण करून उपयोग करावा.
४ इंजिनिअरिंगमधील सर्व शाखांच्या पदवीधारकांना रेल्वेत कामाची भरपूर संधी
४ काही मिनिटात शेकडो किलोमीटर अंतर कापणाऱ्या रेल्वे तंत्रज्ञानामुळे आधीचे सर्व तंत्र निरर्थक