‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’
By Admin | Updated: July 7, 2015 21:15 IST2015-07-07T21:15:41+5:302015-07-07T21:15:41+5:30
महेंद्र नाटेकर : नाटकाचे कणकवलीत प्रकट वाचन

‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’
कणकवली : कोकण विकास म्हणजे केवळ धरणे, पाटबंधारे, बंदर, रेल्वे, रस्ते, कारखाने, उद्योगधंदे, शिक्षण, इत्यादींचा विकास करणे नव्हे तर हा विकास करीत असताना कोकणी माणूस मध्यवर्ती धरून विकास केला पाहिजे; अन्यथा या विकासाचा लाभ कोकणाबाहेरील लोक घेतील नव्हे घेत असून, कोकणी माणूस देशोधडीला लागत आहे. तेव्हा ‘कोकण विकास म्हणजे कोकणी माणसाचा विकास’ ही संकल्पना लक्षात घेऊन ‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे लेखन केले आहे, असे मत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले.‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे प्रकट वाचन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यघरात झाले. यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाट्य लेखनामागील आपली प्रेरणा स्पष्ट केली. यावेळी वामन पंडित, नाट्य दिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम, मनोहर पालयेकर, मोहन काणेकर, डॉ. अनिल तेंडुलकर, डॉ. संदीप नाटेकर, वामन तर्फे, नाटककार पाताडे, विश्वनाथ केरकर, श्रृतिशया डोंगरे, डॉ. विद्याधर करंदीकर, वाय. पी. राणे, शिवाजीराव देसाई, वाय. जी. राणे, सुरेश पाटकर, अशोक राणे, आदी उपस्थित होते.
प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणी लोकांवर महाराष्ट्र शासन प्रचंड अन्याय करीत असून, ही अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांची अस्मिता जागृत करणे हाही नाट्यलेखनाचा उद्देश आहे. ती कोकणी माणसाच्या विकासाबरोबरच त्याच्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्यच हवे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
नाट्यदिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम व प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाटकाचे प्रभावी वाचन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कोकणावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडताना हृदयाला हात घातला गेला. शिक्षण, निवडणुका, वैद्यकीय सेवा, रस्ते, राजकारण, शेती, बागायती, मच्छिमारी, बेरोजगारी, क्रीडा, राजकारणी, आदींवर प्रकाशझोत टाकून दंभस्फोट केला आहे, अशा बहुसंख्य रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नाट्यदिग्दर्शक दीपक परब म्हणाले, या नाटकातून कोकणातील तरुणांच्या व्यथा, वेदना व्यक्त झाल्या आहेत. नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आल्यानंतर पालकांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
नाटककार करंदीकर म्हणाले, कोकण राज्यनिर्मितीसाठी विविध माध्यमातून हा विषय मांडला जात आहे. प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हा विषय नाटकाच्या माध्यमातून एकोणीस प्रवेशातून उत्तमरीतीने हाताळला आहे.
डॉ. अनिल तेंडुलकर म्हणाले, हे नाटक तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याने त्यांच्यासाठी या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी आयोजित करणे आवश्यक आहे. डॉ. संदीप नाटेकर म्हणाले, नाटक वाचन प्रभावी झाले. कोकणातील विविध समस्या तीव्रतेने थोडक्या वेळात समजल्या. या नाटकाशिवाय अनेक एकांकिका सादर झाल्यास अधिक बरे होईल.
गंगाराम साटम म्हणाले, कोकण राज्याबद्दल माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या; पण आता त्या दूर झाल्या. कोकण राज्य झालेच पाहिजे. कलात्मकतेबरोबर माहितीचा आनंद मिळाला. यावेळी पालयेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)