इथे कारवाईनंतरही धगधगतात दारूभट्ट्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 23:38 IST2015-06-03T22:20:15+5:302015-06-03T23:38:38+5:30

उफराटा न्याय : कामगारांवर कारवाई, मालक मोकाटच

Here is a drunken brawl after action! | इथे कारवाईनंतरही धगधगतात दारूभट्ट्या!

इथे कारवाईनंतरही धगधगतात दारूभट्ट्या!

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात गावठी दारूचा महापूर वाहणाऱ्या भागात पोलीस, उत्पादन शुल्क विभागाने सातत्याने कारवाई केल्यानंतरही दारुभट्ट्या पुन्हा धगधगतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कारवाई होऊन या भट्ट्यांतील धग कायमची कधी थांबणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे.
गेल्या वर्षी (२०१४) एप्रिल महिन्यात उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे, खेड तालुक्यातील तिसंगी, कुळवंडी, मजरेकाशी, वालोपे या गावठी दारुचा महापूर येत असलेल्या ठिकाणी मोठी कारवाई केली होती. या धडक कारवाईत वाहनांसह ३० लाखांवर ऐवज जप्त करण्यात आला होता.
विधानसभा निवडणुकीत गावठी दारूचा वापर होऊन त्याचा मतदानावर परिणाम होऊ नये, यादृष्टीने ही कारवाई त्यावेळी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश होते. त्यामुळे जिल्हाभरातून कारवाईचे स्वागत झाले होते.
परंतु गावठी दारूभट्ट्यांवरील कारवाईत सर्वसाधारणपणे भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवर कारवाई होते. मात्र, या दारूभट्ट्यांचे मालक कारवाईपासून दूर राहतात. त्यामुळे कारवाईनंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दारूभट्ट्या पुन्हा कशा काय धगधगतात, असा सवाल निर्माण झाला असून, कायमस्वरुपी दारूभट्ट्या बंद होण्यासाठी कारवाई होणार की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
शासनामार्फत दारूबंदी कायदा करण्यात आला आहे. गावठी दारूच्या उच्चाटनासाठी शासकीय मोहीम सुरूच आहे. तरीही दारूभट्ट्या लावणे काही थांबत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी सोमवारी मिरजोळे परिसरातील धगधगत्या दारूभट्ट्यांची स्थिती पाहून जी तातडीने मोहीम राबवित रातोरात कारवाई केली, त्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
दिवसाढवळ्या मिरजोळेत दारूभट्ट्या लागतात व त्याबाबत संबंधित खात्याला काहीच माहिती नसते, असे म्हणणे डोळ्यावर रुमाल ओढण्यासारखे ठरेल, अशी प्रतिक्रिया आता जनतेतूनही उमटत आहे. मिरजोळेत दारूभट्ट्यांबाबत जे काही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिसले ते पोलीस किंवा उत्पादन शुल्क खात्याला का दिसले नाही, असा सवालही केला जात आहे.
जी स्थिती मिरजोळेत आहे तीच स्थिती जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही आहे. तेथेही रात्रीच्यावेळी दारूभट्ट्या धगधगत आहेत. हा दारूचा महापूर रोजच्या रोज निघत असून, तो सर्वत्र पोहोचविला जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गावठी बेकायदा दारूधंदा संपवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)


जनतेच्या तक्रारींसाठी
स्वतंत्र व्यवस्था हवी
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून मिरजोळेतील दारूभट्ट्यांवर जी कारवाई केली त्याचे सर्वत्र स्वागत होत असून, संबंधित खात्यांनी दर महिन्यात काय कारवाई केली, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. मिरजोळे याठिकाणी कारवाई झाल्यानंतर पुन्हा नव्याने अड्डे सुरु असतात. त्यामुळे जनतेच्या अशा तक्रारी स्विकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.


उत्पादन शुल्कविरोधात नाराजी
भट्ट्यांतील धग कायमची कधी थांबणार? जनतेचा सवाल.
कारवाईनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी धगधगतात हातभट्ट्या.
कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी.
मिरजोळेत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत.
पोलीस अधीक्षकांना दिसले, ते उत्पादन शुल्क खात्याला का दिसले नाही? नागरिकांचा सवाल.

Web Title: Here is a drunken brawl after action!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.