वनौषधी निवडुंग होतेय गावातून दुर्मीळ
By Admin | Updated: July 19, 2015 23:37 IST2015-07-19T22:47:45+5:302015-07-19T23:37:11+5:30
वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे.

वनौषधी निवडुंग होतेय गावातून दुर्मीळ
बाळकृष्ण सातार्डेकर-रेडी -ग्रामीण भागामध्ये शेती बागायतीच्या कुंपणासाठी वापरला जाणारा आणि विविध आजारांवर उपयोगी असा लोकप्रिय बहुगुणी निवडुंग दुर्मीळ होत आहे. शेतीच्या रक्षणाबरोबरच वनौषधी म्हणून उपयुक्त असणाऱ्या निवडुंगाचे कृषी विभागाने जतन करून त्याची लागवड करण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.
वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे. जाड मांसल खोड त्यावर सर्वत्र काटे, विरळ पाने आणि आकर्षक फुले अशी वैशिष्ट्ये असलेले निवडुंग कोकण पट्टीतही चांगल्या प्रकारे वाढते. दलदलीची जागा सोडून शेत, माळरान, कडेकपारी जंगलातील खडकाळ जमीन अशा सर्वच ठिकाणी निवडुंगाची वाढ होते.
आयुर्वेदात याचा मोठा वापर होतो. मनुष्याला शौचास साफ न होणे, खोकला, डांग्या खोकला, कावीळ, यकृताचा आजार, हृदयरोग अशा विविध रोगांवर निवडुंग या वनस्पतीच्या खोडावरची साल, डिंक व चिकापासून बनविलेलेले औषध जालीम उपायकारक आहे. हे औषध सेवन केल्यास रूग्ण तत्काळ बरा होऊ शकतो, तसेच निवडुंग हे उत्तम आयुर्वेदिक औषध म्हणूनही आजही ग्रामीण भागात विशेष परिचित आहे.
आयुर्वेदात निवडुंगाला फार महत्त्व देण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील वैद्य विविध औषधात निवडुंगाचा वापर करत होते. परंतु बदलत्या काळानुसार याचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निवडुंगाच्या झाडावरील काट्यामुळे फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर शेती बागायती आणि काही ठिकाणी घरांच्याही कुंपणाकरीता केला जातो. गावातील पडीक जमिनीतही टिकाव धरण्याच्या वैशिष्ट्यांमुळे निवडुंगाच्या कुंपणाची वर्षानुवर्षे देखभाल करावी लागत नाही.
याशिवाय काटे आणि चिकट कडवट डिंक यामुळे प्राण्यांकडून याचे नुकसान होत नाही. तसेच भटके प्राणीसुद्धा निवडुंग असणाऱ्या कुंपणाच्या परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग निवडुंगाला शेतीचा रक्षणकर्ता म्हणतो.
बदलत्या काळानुसार गावागावांमध्ये दगड, चिरे आदी साहित्याचा कुंपणासाठी वापर होऊ लागल्याने पारंपरिक निवडुंग या वनस्पतीचे कुंपण विरळ झाले आहे. परंतु अशा प्रकारचीच कुंपणे सुरक्षित व अल्प दरात निर्माण होणारी असल्याचे जाणकारांचे मत असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे.
पूर्वी खेड्यापाड्यातील वैद्य निवडुंगाचा मोठा वापर करत होते. आताही काही आयुर्वेदिक औषधांसह विविध औषधांसाठी याचा वापर होतो. पण आपल्याला याची अजूनही जाणीव नसल्याने याचे उत्पादन मंदावले आहे. याबाबत शेतकरी, बागायतदारांमध्ये जाणीवजागृती केली, तर नक्कीच याचे उत्पन्न वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही शेती उत्पादनाला पर्याय निर्माण होऊन शेतकरी नफ्यात येऊ शकतो.
- बागायतदार प्रसाद रेडेकर