तिलारीच्या पाण्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी
By Admin | Updated: October 31, 2014 23:31 IST2014-10-31T23:29:48+5:302014-10-31T23:31:03+5:30
खलिद अन्सारी : तिलारी येथे अधीक्षक अभियंत्यांची बैठक

तिलारीच्या पाण्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी
कसई दोडामार्ग : तिलारी धरणात १४ टीएमसी एवढा मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. १६ कोटी रुपये खर्च केले. मात्र, सिंचन क्षेत्रासाठी अतिशय नगण्य पाण्याचा वापर होतो, अशी खंत व्यक्त करून पाण्याचा वापर जास्तीत जास्त शेतकरी कसे करतील, यासाठी तालुकाभर पाण्याचे नियोजन करा. तिलारी धरणाच्या वरील बाजूस पाणी कोणाला पाहिजे असेल, तर द्या. जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र पाण्याखाली येणे आवश्यक आहे. अशा सूचना तिलारी कालवा विभागाचे अधीक्षक अभियंता खलिद अन्सारी यांनी तिलारी येथे आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
गोवा व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य प्रकल्प पूर्णत्वास आला. १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या धरणात १४ टीएमसी एवढा मुबलक पाणी साठा आहे. गोवा राज्याने या पाण्याचा वापर योग्य प्रकारे केला आणि सिंंचनक्षेत्र वाढविले. मात्र, दोडामार्ग तालुक्यात ज्याप्रमाणे पाण्याचा वापर होणे आवश्यक आहे, तसा होत नाही. त्यामुळे धरणात पाणी असूनसुध्दा त्याचा वापर होत नसल्याने तिलारी कालवा विभाग चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाण्याचा वापर सिंचन क्षेत्रासाठी व्हावा, यासाठी गुरुवारी तिलारी रेस्ट हाऊस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कार्यकारी अभियंता धीरज साळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, माजी सभापती सीमा जंगले, गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी जी. ए. धरणे, उपविभागीय अधिकारी एस. एस. थोरात, वि. ग. देसाई, मंडळ कृषी अधिकारी तसेच खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आधुनिक दर्जेदार पिके घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. जेणेकरून पाण्याचा जास्तीत जास्त वापर होईल. कोलझर, झोळंबे, तळकट या भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहे. त्यांना कालवा काढून पाणी द्या. तसेच उसप, खोक्रल, पिकुळे या गावांनाही पाणी द्या, असे सांगितले.
त्यावर अन्सारी यांनी सांगितले की, कोलझर, झोळंबे, तळकट या गावांना पाणी देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. तसेच पिकुळे, खोक्रल, उपस गावांनाही पाणी देण्यासाठी तरतूद केली आहे. विर्डी धरणाच्या पाण्याचेही नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रशांत चव्हाण म्हणाले, तिलारी कालवा विभागाच्या अंतर्गत नऊ ग्रामपंचायती येतात. त्यांनाही पाणीपट्टी भरण्यासाठी पत्रे, नोटिसा आल्या. सुमारे १६ लाख ६१ हजार एवढी पाणीपट्टी आली. मात्र, या ग्रामपंचायती ही पाणीपट्टी भरण्यास तयार नाहीत. धरण अलिकडचे आहे. मात्र, त्या अगोदरपासून आमचे पाण्याचे स्त्रोत आहेत, असे सांगितले. यावर अन्सारी यांनी, नियमाप्रमाणे पाणीपट्टी भरावीच लागणार आहे. यासाठी अन्य मार्गही काढला जाऊ शकतो, असे त्यांनी सुचविले.
कृषी अधिकारी कांबळी यांनी सांगितले की, या भागातील शेतकरी दोन हंगामात शेती करतात. तीच शेती हंगामात केल्यास पाण्याचा वापर होईल व शेतकऱ्यांना पिकांच्या रुपात पैसा मिळेल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अन्सारी यांनी सांगितले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्यात फिरून शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांचे म्हणणे ऐकावे. तसेच पडीक जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी पाणीवाटप संस्था स्थापन करा, असे आवाहन अधीक्षक अभियंता खलिद अन्सारी यांनी केले. (वार्ताहर)