विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:02:57+5:302016-01-02T08:29:27+5:30
अश्रू पुसण्याचा प्रयत्न : खरवते कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे औदार्य

विद्यार्थ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अभिनव ‘मदतगार’ उपक्रमाद्वारे ५१ हजार रुपयांचा निधी जमवून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे. या निधीचा धनादेश सोमवारी कार्याध्यक्ष शेखर निकम यांच्याहस्ते ‘नाम’ संस्थेचे समन्वयक हरिष हितापे यांच्याकडे कृषी महाविद्यालय सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ. सुनीतकुमार पाटील, प्रा. गजानन आढाव, प्रा. हरिश्चंद्र भागडे, सुशील ससाणे उपस्थित होते. हितापे यांनी सांगितले की, आज कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे. शेतामध्ये पिकवलेल्या धान्याला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच वारंवार येणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
आजच्या युवकांनी पुढे येत शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. हस्तांतर व रुपांतर करण्याने उद्योग मोठे झाले. परंतु, शेतामध्ये काबाडकष्ट करून धान्य पिकवणाऱ्याच्या मालाला भाव नाही. एकीकडे सातवा वेतन आयोग जाहीर होतो. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात. परंतु, ज्या कृषीक्षेत्रावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यांचे अर्थशास्त्र मात्र सरकारला कळत नाही. आत्ताचे सरकार हे उद्योग - धंदेवाल्यांचे आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात निधी जमवून शेतकऱ्याला मदत करावी लागते, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे तरुणांनी स्वयंप्रेरीत होऊन कृषी क्षेत्राला गतवैभव आणणे ही काळाची गरज आहे.
यावेळी शेखर निकम यांनी सांगितले की, आपल्या ताटातील घास उपाशी जीवाला देऊन माणुसकी जपणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे. सामाजिक बांधिलकीची भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांनी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपत्तीग्रस्त, पूरग्रस्तांसाठी यापूर्वीही संस्थेने मदतकार्य केले आहे. (वार्ताहर)