स्वाईन फ्लूबाबत सरपंचांना मदतीची साद
By Admin | Updated: February 26, 2015 00:11 IST2015-02-25T22:52:27+5:302015-02-26T00:11:13+5:30
जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवले पत्र

स्वाईन फ्लूबाबत सरपंचांना मदतीची साद
रत्नागिरी : राज्यात स्वाईन फ्लूचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी सहकार्य करावे, अशी साद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी जिल्ह्यातील सरपंचांना घातली आहे.
सध्या राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरात ‘स्वाईन फ्लू’ची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मौजे गवाणे (ता. लांजा) आणि भाटीमिऱ्या (ता. रत्नागिरी) येथे ‘स्वाईन फ्लू’चा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी व डोकेदुखी आदी ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे, असेही सरपंचांना पाठवलेल्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे. आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने मुंबई व पुणे येथून येणाऱ्या चाकरमान्यांकडून कदाचित ‘स्वाईन फ्लू’ची लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातही सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात ‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास त्यास तातडीने शासकीय रुग्णालयात पाठवावे. ‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सरपंचांना केली आहे. (शहर वार्ताहर)