आयनीतील वाळीत कुटुंबाला अखेर न्याय
By Admin | Updated: July 7, 2015 01:01 IST2015-07-07T01:01:23+5:302015-07-07T01:01:36+5:30
अशोक जांभळेंचे प्रयत्न : भविष्यात प्रकार न घडण्यासाठी प्रयत्न

आयनीतील वाळीत कुटुंबाला अखेर न्याय
चिपळूण : खेड तालुक्यातील आयनी भोईवाडी वाळीत प्रकरणी खेडचे पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांनी अखेर शनिवारी पडदा टाकला. यावेळी सरपंच संतोष कान्हेरे व प्रतिष्ठीत ग्रामस्थ उपस्थित होते.
आयनी - भोईवाडी येथे प्रदीप करजवकर यांनी आपल्याला वाळीत टाकले असल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक जांभळे यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शनिवारी एकत्र बोलावले होते. यावेळी सरपंच संतोष कान्हेरे, उपसरपंच रत्नाकर महाकाळ, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डी. एस. महाकाळ, मुंबईचे अध्यक्ष वसंत पारधी, सचिव संतोष महाकाळ, गावचे राजेंद्र पारधी, उपाध्यक्ष राजाराम महाकाळ, रघुनाथ पारधी, राजाराम पारधी, अशोक पारधी, प्रदीप बंदरकर, सतीश सैतवडेकर, राजेश बंदरकर, आत्माराम बंदरकर, आत्माराम धुमाळ, रुपेश करजवकर, बाळकृष्ण करजवकर, अमोल करजवकर, अशोक करजवकर, शशिकांत करजवकर, सुभाष करजवकर उपस्थित होते.
दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात केलेल्या शक्ती प्रदर्शनाबद्दल पोलीस निरीक्षक जांभळे यांनी खंत व्यक्त केली. जो शक्तीप्रदर्शन करतो तो चुकलेला असतो ,असे सांगून दोन तास उपस्थितांना प्रबोधन केले. त्यानंतर वाळीत टाकणे म्हणजे काय? ते कसे टाकले जाते? याबाबत त्यांनी पुरेशी माहिती दिली. भोईवाडीतील सार्वजनिक मंदिराला टाळे असल्याबाबत चर्चा झाली. समज-गैरसमज दूर होऊन मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर बंद असणे योग्य आहे, असे सांगण्यात आले. करजवकर यांच्या अंगणातून नळपाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे. याबाबत सरपंच कान्हेरे यांनी चर्चा केली व समझोता केला. एकूण सर्वच तक्रारींचे निराकरण झाल्याने दोन्ही गटांचे समाधान झाले. या सगळ्या वादाला करजवकर भावकी जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भावकीतील वाद स्थानिक पातळीवर मिटवावा. गरज पडल्यास तंटामुक्त समितीकडे जा. परंतु, गावातील किंवा समाजातील लोकांनी यामध्ये हस्तक्षेप करु नये. योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा पोलीस ठाण्यात या, असे सुचविले. अंतर्गत वादामुळे गावच्या विकासाला खीळ बसली व गावचे नाहक नुकसान झाले. यामुळे गावची बदनामी झाली. त्यामुळे भविष्यात असे घडू नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून उपसरपंच महाकाळ यांनी जांभळे यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)