आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळाचा महिलेला फटका
By Admin | Updated: November 9, 2014 23:28 IST2014-11-09T22:19:35+5:302014-11-09T23:28:23+5:30
डॉक्टर व आरोग्य रुग्णवाहिकेचे चालक उपस्थित नसल्याने तेथे कोणीच पोहोचू शकले नाही,

आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळाचा महिलेला फटका
आंबोली : आंबोली चुरणीची मुरू या धनगरवस्तीत अनिता बाबू झोरे या ३० वर्षीय महिलेची प्रसुती घरातच झाली. याबाबत आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता, चौकुळ उपविभागात हे कार्यक्षेत्र येत असल्याने सुषमा वंजारे या आरोग्य सेविका त्या ठिकाणी काम करीत असल्याची माहिती मिळाली. याबाबत वंजारे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र, आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
महिला अधूनमधून या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येत होती. परंतु सध्या आंबोली आरोग्यकेंद्रात चालत असलेल्या डॉक्टरांच्या सावळ्या गोंधळामुळे या महिलेची प्रसुतीची तारीखच तिला माहिती नव्हती. कारण दर चार-पाच दिवसांनी या ठिकाणी डॉक्टर बदलत होते. असे असतानाही संबंधित भागातल्या आरोग्य सेविकेने याची नोंद करून घेऊन याबाबत योग्य पाठपुरावा गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही.
६ नोव्हेंबरला या महिलेची प्रसुती तिच्या राहत्या घरी तुरणीची मूस येथे झाली. परंतु यावेळी डॉक्टर व आरोग्य रुग्णवाहिकेचे चालक उपस्थित नसल्याने तेथे कोणीच पोहोचू शकले नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची कारवाईच्या भीतीने तारांबळ उडाली व त्यांनी लागलीच ७ नोव्हेंबर रोजी तोरणीची मूस गाठून त्या महिलेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन माता आणि बालकावर उपचार सुरू केले. परंतु काही काळाने तिच्या नातेवाईकांनी तिला जबरदस्तीने घरी नेले. यावेळी आंबोली केंद्रातून बाळ आणि मातेच्या पायाला जखमा झाल्याचे सांगितले. आमचे काहीही ऐकून घ्यायला तिचे पालक तयार नव्हते. आमचे आम्ही बघून घेऊ, असे सांगून तिला घरी नेण्यात आले. अशाचप्रकारे या महिलेचे पहिले बाळ अशा आडमुठ्या धोरणामुळे तीन वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे पालकांच्या अज्ञानामुळे याही बाळावर उपचार न झाल्यास त्याच्या जिवीतास धोका पोहोचू शकतो, असे आरोग्यसेविका कोठावळे यांनी सांगितले.
या घटनेमुळे आंबोलीच्या आरोग्य केंद्राचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. अंतर्गत कुरघोडी, पदाधिकाऱ्यांच्या मानपानावरून डॉक्टरांच्या बदल्या, अचानक रजा टाकून गायब होणारे डॉक्टर यामुळे आंबोली प्राथमिक आरोग्य
केंदाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)