डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज
By Admin | Updated: November 9, 2014 01:49 IST2014-11-09T01:45:15+5:302014-11-09T01:49:10+5:30
सर्व्हे करण्याचे संचालकांचे आदेश

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज
सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले असून कित्येकजणांचा बळीही या तापाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या निर्मूलनासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरु करण्याचे आदेश आरोग्य संचालक सतीश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभाग कामाला लागला असून साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्यात डेंग्यू तापाने थैमान मांडले आहे. हजारो रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. तर कित्येकजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे. सिंधुदुर्गात मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळत असले तरी या तापाने सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. असे असले तरी या डेंग्यूच्या निर्मूलनासाठी पूर्ण जिल्हाभर सर्वेक्षण करा असे आदेश आरोग्य संचालक पवार यांनी देत आरोग्य विभागास सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या साथीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त करून शहरी भागात होत असल्याने शहराच्या ठिकाणी जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, कोणत्याही रुग्णाचा या साथीने मृत्यू झालेला नाही. डेंग्यू हा साथरोग नियंत्रणात येण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आरोग्यसेवक, सेविकांमार्फत गृहभेट कार्यक्रमही सुरु आहे. तसेच या रोगाच्या निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. औषधसाठाही पुरेसा आहे. (प्रतिनिधी)