लोटे औद्योगिक परिसराचे आरोग्य ढासळले
By Admin | Updated: November 14, 2014 23:13 IST2014-11-14T23:03:57+5:302014-11-14T23:13:55+5:30
तीन हजारांहून अधिक रुग्ण : वैद्यकीय सुरक्षेची हमी कोण घेणार?

लोटे औद्योगिक परिसराचे आरोग्य ढासळले
आवाशी : लोटे परशुराम औद्योगिक वसाहत परिसरात समाविष्ट असणाऱ्या गावातील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्ण वैद्यकीय उपचार घेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यांसह श्वसन व त्वचेच्या आजाराचे अधिक रुग्ण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये परिसराचा विकास जितका झपाट्याने होत गेला तितक्याच वेगाने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी चिपळूण येथील डी. बी. जे. महाविद्यालयात एका वैद्यकीय शिबिरांतर्गत झालेल्या चाचणीत गंभीर बाब उघड झाली होती व त्याचा परिणाम सर्वदूर पसरला. याबाबतीत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी, सीईटीपी प्रदूषण मंडळ व औद्योगिक क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. तेथे असणारी कारखानदारी पूर्णपणे रासायनिक स्वरुपाची आहे. जलप्रदूषणासह वायू प्रदूषणाचा परिणाम येथील मानवी वस्तीवर होतो. त्यामुळेच हे आजार होत असल्याचे पुढे येत आहे.
लोटे औद्योगिक परिसरात रासायनिक क्षेत्र असल्याने तेथे रुग्णांना विविध प्रकारचे आजार होत असल्याचे एका चर्चासत्रात निष्पन्न झाले होते. त्यानंतर याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात आली नाही.
अनेकांना श्वसनाच्या विकारासह त्वचेच्या आजाराने ग्रासले आहे. नुकताच या परिसरात डेंग्यूचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले. येथील वैद्यकीय सुत्रांकडून माहिती घेतली असता ही बाब उघड झाली. (वार्ताहर)
महामार्गावरील लवेल, दाभीळ ते परशुराम या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्रासह २१ खासगी वैद्यकीय सेवा देणारे क्लिनिक आहेत. याठिकाणी उपचारासाठी अनेक रुग्ण येत असतात. या सर्व गाव परिसरात प्रत्येक खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सुमारे १५० रुग्णांची तपासणी होत आहे.