अपघातात मुख्याध्यापिका ठार
By Admin | Updated: August 5, 2014 00:11 IST2014-08-04T23:22:47+5:302014-08-05T00:11:12+5:30
ट्रकचालक ताब्यात : कणकवलीत महामार्गावर घटना

अपघातात मुख्याध्यापिका ठार
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात अपर्णा अरविंद साटम (वय ४९) या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेचा मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे घडली. दरम्यान, या अपघातप्रकरणी ट्रकचालकावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपर्णा साटम या येथील कलमठ लक्ष्मणनगर येथे राहत होत्या. आज सकाळी कलमठ येथून कळसुली भोगनाथवाडी जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी त्या दुचाकी (एमएच ०७ वाय ९००५)वरून निघाल्या होत्या. यावेळी ट्रकचालक संतोष श्रीरंग गोरे (३८, रा. सातारा) हा ट्रक (एमएच १२ एच क्यू ७९६७) घेऊन पुण्याहून गोव्याला निघाला होता. यावेळी महामार्गावरील रामेश्वर प्लाझासमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये अपर्णा साटम या दुचाकीसह रस्त्यावर कोसळून ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना अपर्णा साटम यांनी आपल्या घरचा दूरध्वनी क्रमांक देऊन कुटुंबीयांना अपघाताबाबत माहिती देण्यास सांगितले व त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर साटम यांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली.
कळसुली भोगनाथवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या अपर्णा साटम यांचे माहेर कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथे असून, त्यांचे पूर्वीचे नाव ललिता धोंडू सावंत असे आहे. मालवण तालुक्यातील कोईळ चारिवडे येथे सासर असलेल्या अपर्णा साटम सध्या कलमठ लक्ष्मणनगर येथे राहात होत्या. त्यांच्या मृत्यूची माहिती समजताच या गावांवर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती गिर्ये येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेबाबत अधिक तपास पोलीस हवालदार रविकांत अडुळकर करीत आहेत. (वार्ताहर)