झोळंबेच्या सरपंचांना माकडताप?
By Admin | Updated: February 11, 2016 00:35 IST2016-02-10T22:06:45+5:302016-02-11T00:35:25+5:30
आरोग्य पथक दाखल : रक्ताचे नमुने तपासणीसाठी कोल्हापूरला; तळकट येथे सापडले मृत माकड

झोळंबेच्या सरपंचांना माकडताप?
कसई दोडामार्ग : झोळंबेचे सरपंच सतीश कामत यांना माकडताप झाल्याची शक्यता असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली
आहे. जिल्हा आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले असूून, कामत यांच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. साळे यांनी दिली.
तळकट व झोळंबे येथे बैठक घेऊन माकडतापाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तळकट परिसरात लाल तोंडाचे माकड मृतावस्थेत सापडल्याने माकडतापाच्या
रुग्णांमध्ये वाढ होऊ नये,
यासाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत
आहे.
केर येथील माकडतापाची साथ आटोक्यात येत असतानाच
तळकट हॉस्पिटलमध्ये माकडतापाचा संशयित रुग्ण आढळला आहे. झोळंबेचे सरपंच सतीश कामत यांना ताप आल्यानंतर तपासणी केली असता माकडतापाची लक्षणे दिसून आली. ताबडतोब त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या रक्ताचे नमुने कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहेत. मंगळवारी आरोग्य अधिकारी डॉ. साळे,
तालुका अधिकारी तुषार
चिपळूणकर तळकट येथे दाखल झाल्यानंतर माकडतापाबाबत तळकट झोळंबे येथे बैठक पार
पडली.
संशयित रुग्णांचे व गोचिडीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तापाची लक्षणे डेंग्यू, मलेरिया,
टायफाईड, आदी अन्य
तापांसारखीच असल्याने त्याचे
निदान लवकर होत नाही. हा ताप कुठला आहे, याचे निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
माकडताप नियंत्रणासाठी जनावरांच्या गोठ्यात औषध फवारणी करण्याचे आवाहन
डॉ. साळे यांनी ग्रामस्थांना माकडतापाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी माकडताप हा गोचीड चावल्याने
होत असून, यासाठी गोचीड निर्मूलनाचे आवाहन केले.
माकडांना विषारी गोचीड चावल्याने त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. या गोचिडी पाळीव जनावरांना लागून त्याद्वारे या तापाची लागण सर्वत्र होते. पाळीव जनावरांच्या अंगावरील एक मोठी गोचीड सुमारे दीड हजार अंडी देते.
माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी गोचिडी नष्ट केल्या पाहिजेत. त्यासाठी गॅमा बी.एच. सी. पावडर संबंधित परिसरात व जनावरांच्या गोठ्यात फवारण्याचे आवाहन केले. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.