वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

By Admin | Updated: December 1, 2014 00:20 IST2014-11-30T21:00:04+5:302014-12-01T00:20:18+5:30

रवींद्र खानविलकर : तोंडवलीतील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Have a scientific perspective | वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

नांदगांव : शरीरासारखे मनालाही विविध आजार होतात आणि माणसाला विविध आभास होतात त्याचाच फायदा भोंदूबाबा उठवत असतात. मात्र विज्ञानासमोर अशा कुठल्याही तांत्रिक मांत्रिकाचा टिकाव लागला नसल्याने अंधश्रद्धा, जादूटोणा यावर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा, असे प्रतिपादन जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे कोकण विभाग संघटक रवींद्र खानविलकर यांनी केले. ते तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यापुढे बोलताना खानविलकर म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्काराचा प्रसार व प्रचार करून लोकांना फसवितात. अशांवर दहशत बसणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.
२१ लाखाचे बक्षीस
आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे, जादूटोणा, मंत्रतंत्र टाकून चमत्कार करून दाखविणाऱ्याचा विज्ञानापुढे टिकाव लागला नाही. कोणीही चमत्कारीक बाबांनी पुढे येवून आपल्यामध्ये असलेली अतिंद्रीय व्यक्ती सिद्ध केल्यास त्यासाठी २१ लाखाचे बक्षिसही देण्यात येईल. मात्र आजपर्यंत एकहीजण यामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे आपण कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये असेही यावेळी सांगण्यात आले.
या लोकांकडून करून दाखविण्यात आलेले चमत्कारांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. पेटता कापूर तोंडात टाकणे, अगरबत्ती आपोआप गोल फिरणे आदी प्रकार दाखविण्यात आले.
सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी तोंडवली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात समीर साळकर, संदीप तांबे, दिक्षा पुरळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक चव्हाण, प्राचार्य महेश बामणी, भीमराव चौगुले, ध्वजेंद्र मिराशी, दीपाली जामदार, मीना वाडकर, सोनाली सावंत व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)


भातापेक्षा भूतांचे पीक जास्त
कोकणपट्ट्यात भात हे प्रमुख पीक आहे. मात्र, याठिकाणी भाताच्या पिकापेक्षा भूतांचे पीक जास्त असल्याचे दिसून येते. याचाच फायदा घेऊन भोंदूबाबा लोकांची लुबाडणूक व फसवणूक करतात. मात्र विज्ञानासमोर हे सर्व खोटे पडले असल्याने कुणीही अशा भूताखेतांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही खानविलकर यांनी केले.

Web Title: Have a scientific perspective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.