मनावर चांगले संस्कार रुजवावेत
By Admin | Updated: March 23, 2015 00:46 IST2015-03-22T22:25:23+5:302015-03-23T00:46:35+5:30
मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन

मनावर चांगले संस्कार रुजवावेत
कणकवली : पालक हे आपल्या पाल्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य देत नाहीत. त्यांना अनेक बंधनांत अडकून ठेवतात. त्यामुळे पाल्याला आपले पालक हे हिटलर वाटतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे मित्र बनावे. त्याच्यामधील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या मनावर चांगल्या संस्कारांची रुजवण करावी, असे आवाहन मनोज अंबिके यांनी केले.एलआयसी आॅफ इंडियातर्फे कणकवली येथे ‘कानमंत्र आई- बाबांसाठी’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजिला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपपोलीस निरीक्षक जे. डी. भोमकर, अशोक करंबेळकर, श्रीनिवास पळसुले उपस्थित होते. अंबिके पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात पालक व पाल्यांमध्ये संवाद होत नाही. त्यामुळे कुटुंबात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. यावर मात करायची असेल तर पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र बनले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यातून त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात येईल. पालक व पाल्यांमध्ये होणाऱ्या सुसंवादामुळे कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न व समस्या सुटतील असे त्यांनी सांगितले.पालक व पाल्यांमध्ये सुसंवाद होत नसल्यानेच त्यांची पावले वाईट मार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांसाठी दिवसातून काही वेळ द्यावा. जेणेकरून त्यांचे भावविश्व काय आहे याची कल्पना येईल. त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे समजून येईल. त्यांचे जर चुकीचे पाऊल पडत असेल तर त्यांना आपण रोखू शकतो. पालकांनी पाल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्राचे ज्ञान द्यावे. त्यांच्यावर दबाव आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)++
मनोज अंबिके यांनी या कार्यक्रमात उपस्थित पालकांशी थेट संवाद साधून आपल्या पाल्यांशी कसे वागावे याच्या टीप्स दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.
प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते; परंतु पालक हे आपल्या पाल्याने हेच केले पाहिजे याकरिता त्याच्यावर सातत्याने दबाव टाकत असतात. त्यामुळे ते पाल्य दबावाखाली असते. त्यामुळे या पाल्याला आपले पालक जणू हिटलरच आहेत असे वाटू लागते.
अलिकडच्या काळात पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे.