हापूस आंबा पडणार लांबणीवर!
By Admin | Updated: December 3, 2015 23:50 IST2015-12-03T21:29:46+5:302015-12-03T23:50:14+5:30
हवामानात बदल : कलमे पालवीने बहरली; बागायतदार, व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

हापूस आंबा पडणार लांबणीवर!
प्रसाद बागवे -- कुणकेश्वर-आंबा उत्पादनात ‘देवगड’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. किंबहुना आंबा उत्पादनात देवगड तालुका नेहमी अग्रेसर असतो. तसेच विविध बाजारपेठांत हापूसला चांगली मागणी असते; परंतु चालू वर्षी डिसेंबर उजाडला तरी कलमांना मोहोर नाही. प्रतिवर्षी कलमांना सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यात मोहोर येऊ लागतो. परंतु बदलत्या हवामानामुळे आंबा पिकासाठी पोषक हवामान तयार होत नसल्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदार व व्यावसायिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गतवर्षी आंबा बागायतदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते.
त्यामध्ये अवकाळी झालेला पाऊस, तुडतुडा, ध्रिप्ससारख्या रोगांवर न होणारा औषधांचा परिणाम तसेच पावसामुळे आंब्यावर आलेले काळे डाग आदी कारणांमुळे आलेला अवाढव्य खर्च यामुळे अगोदरच गेल्या वर्षीच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्यांच्या डोेक्यावर आहे. तरीसुद्धा निसर्ग साथ देईल या आशेने शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.
विशेषकरून दिवाळीच्या सणाच्या सुरुवातीला दोन दिवस वातावरणात गारवा मोठ्या प्रमाणात झाला होता. परंतु लगेच वातावरणात पुन्हा बदल झाला. त्याचा परिणाम पिकावर होताना दिसून येतो. संपूर्ण तालुक्यात कलमांनी पालवी धारण केल्याचे चित्र दिसते. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक लवकर हातात येण्यासाठी कल्टारचा वापर करूनही कलमांना अजून मोहोर आलेला नाही. त्यामुळे आंबा पीक हाती येण्याआधीच नुकसानीची झळ शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अजून मोहोर नसल्याने आंबा पिकाचा पहिला टप्पा संपला आहे.
जर येत्या काही दिवसांत थंडी वाढली तर कलमे एकाचवेळी मोहोर धारण करतील व एकाचवेळी उत्पादन झाल्याने आंबा तोडणीमध्ये टप्पे करता येणार नाही.
परिणामी एकाचवेळी उत्पादन झाल्यामुळे विक्रीचे दरही घसरण्याची भीतीही बागायतदार व अडतदार यांच्यामधून व्यक्त होत आहे. गतवर्षी झालेले नुकसान व यावर्षीही सुरुवातीस होणारी कसरत यामुळे शेतकरी उदास झाला असून निसर्गाकडे याचना करत आहे.