गावागावात मृत्यूची ‘टांगती टाकी’
By Admin | Updated: December 30, 2015 00:33 IST2015-12-29T22:18:43+5:302015-12-30T00:33:42+5:30
दुर्घटनेच्या भीतीने ग्रामस्थांना ग्रासले : स्लॅब ढासळला, पिलर मोडकळीस, पायाही खचला; सुपनेसह अनेक गावांत भयावह स्थिती--कऱ्हाड फोकस... ..

गावागावात मृत्यूची ‘टांगती टाकी’
कऱ्हाड : नळ योजनेच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, काही गावांतील पाण्याच्या टाकीची स्थिती गंभीर असल्याचे दिसते. टाक्यांना तडे गेले आहेत. पाया खचला आहे. तसेच पिलरही ढासळण्याच्या स्थितीत आहेत; पण तरीही टाक्यांच्या या परिस्थितीकडे ग्रामपंचायती गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते.
साईकडे गावात सोमवारी सकाळी पाण्याची टाकी कोसळून चारजण जखमी झाले. या दुर्घटनेत मोठी जीवितहानीही झाली असती. मात्र, दररोज टाकीखाली गप्पा मारणारे ग्रामस्थ त्यावेळी टाकीखाली नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तसेच पाटण तालुक्यातील काही गावांचा आढावा घेतला असता पाण्याच्या टाक्यांचे भीषण वास्तव समोर आले.
कऱ्हाड तालुक्यातील सुपने गावाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची टाकी आहे. सुमारे १९८० मध्ये या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. टाकीनजीक पिंपळाचे झाड असून, येथे गर्द सावलीत दररोज सकाळी व सायंकाळी ग्रामस्थांचा गप्पांचा फड रंगतो. तसेच येथे बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आले आहेत. मात्र, सध्या ही टाकी धोकादायक बनली आहे. टाकीला गळती लागली असून, ठिकठिकाणचा स्लॅब ढासळला आहे. पिलरच्या लोखंडी तारा सहज दृष्टीस पडत आहेत. पायाही खचला असून, ही टाकी कधीही ढासळू शकते. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने टाकी धोकादायक बनल्याने परिसरात कोणीही थांबू नये, अशा सूचनेचा फलक लावला होता. मात्र, काही दिवसातच फलक गायब झाला. ग्रामस्थ आजही टाकीखाली बसल्याचे दिसते.
कोपर्डे हवेली येथील पाण्याच्या टाकीची अवस्थाही गंभीर आहे. येथे चोवीस तास पाणी योजनेची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्या टाकीतून पाणी पुरवठा होत नाही. जुन्याच टाकीतून गावाला पाणी पुरविले जाते. गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. तर नळ कनेक्शन धारकांची संख्या सुमारे एक हजार आहे. या जुन्या टाकीचे काम १९७९ च्या सुमारास करण्यात आले. त्यानंतर अद्याप कधीही टाकीची डागडुजी झाली नाही. परिणामी, टाकीचा स्लॅब निखळला असून, पिलरला तडे गेले आहेत. मसूर येथील पाण्याच्या टाकीचीही मोठी दुरवस्था झाल्याचे दिसते. मसूरची लोकसंख्या सुमारे नऊ हजार आहे. येथे १९८० मध्ये पाण्याची टाकी उभारण्यात आली. या टाकीद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जाऊ लागला. मध्यंतरीच्या कालावधीत या टाकीची काही प्रमाणात पडझड झाली. मात्र, ग्रामपंचायतीने दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. (लोकमत चमू)
तांबवेत जुनी टाकी पाडली
तांबवे येथील पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे.त्यातच गावासाठी चोवीस तास पाणी योजना मंजूर झाली. त्यामुळे या योजनेतून येथील नवीन नळ कनेक्शन व नवीन टाकीचे काम पूर्ण झाले आहे. दोन वर्षांपासून गावाला नवीन टाकीतून पाणी पुरवठा होत आहे. जुनी टाकी पाडण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यासाठी ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडून सुमारे एक लाख रुपये घेतले.
माजगावला पेयजलच्या टाकीचे काम निकृष्ट
माजगाव, ता. पाटण येथे पेयजल योजनेतून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र, या टाकीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सध्याचे काम निकृष्ट झाल्याने काही वर्षांतच ही टाकी ढासळू शकते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याबाबतचा पत्र व्यवहारही प्रशासनासोबत करण्यात आला आहे.
ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे तसेच योजनेचे काम दर्जात्मक पद्धतीचे करण्यात येते. सध्या धोकादायक टाकीबाबत म्हासोली ग्रामस्थांकडून प्रस्ताव आलेला आहे. त्या गावातील टाकीची पाहणी केली आहे. अन्य काही गावांतील टाकी धोकादायक बनली असल्यास संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
- एम. डी. आरळेकर,
उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पंचायत समिती, कऱ्हाड
म्हासोलीकरांना पाणी न
वापरण्याचे आदेश
कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली या गावात सध्या धोकादायक स्थितीत पाण्याची टाकी उभी आहे. म्हासोलीतील ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या उपअभियंत्यांकडे टाकीच्या गंभीर अवस्थेबाबत पाहणी करण्याची मागणी केली असून, त्या टाकीचे पाणी न वापरता चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाणी वापरावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
वर्षभरात बारा
गावांमध्ये नवीन टाक्या
कऱ्हाड तालुक्यातील १२ गावांमध्ये वर्षभरात पाणी पुरवठा योजना व ग्रामपंचायतीकडून नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये चोरे, दुशेरे, कालगाव, कोरेगाव, कोर्टी, माळवाडी, मुनावळे, म्होप्रे, सुर्ली, शेळकेवाडी, शिंगणवाडी, वारुंजी या गावांचा समावेश आहे.
...या गावात आहे धोका !
कऱ्हाड तालुक्यात तीन गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तीस ते चाळीस वर्षांपूर्वी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. टाक्यांच्या लोखंडी सळ्यांना गंज चढलेला आहे. अभयचीवाडी, म्हासोली आणि वडगाव हवेली या गावांमध्ये धोकादायक स्थितीत पाण्याच्या टाक्या आहेत.
पाटणला जुनी टाकी धोकादायक
पाटण हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. पाटणला इतर गावांतून येणाऱ्या ग्रामस्थांची संख्याही जास्त आहे. तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी ६ कोटीतून पाटणला पाणी पुरवठ्यासाठी नवीन टाकी बांधली आहे. मात्र, तहसील कार्यालयानजीकची पाण्याची जुनी टाकी अद्यापही उभीच आहे. या टाकीची अवस्था गंभीर असतानाही त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. ही टाकी कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.