जिल्ह्यात हत्तींचा धुडगूस सुरुच
By Admin | Updated: November 24, 2014 23:12 IST2014-11-24T22:07:28+5:302014-11-24T23:12:43+5:30
नुकसानीचा पंचनामा : कुडाळ तालुक्यातील डिगसच्या दिशेने रवाना

जिल्ह्यात हत्तींचा धुडगूस सुरुच
सिंधुुदुर्गनगरी/कणकवली : वैभववाडी, कणकवली मागोमाग आता ओसरगावातही हत्तींनी थैमान मांडायला सुरुवात केली असून संपूर्ण परिसर भितीच्या छायेखाली वावरत आहे. तीन हत्तींचा एक कळप असून या हत्तींचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान, ओसरगांव कानसळीवाडी येथे हत्तींनी एका शेतकऱ्याची भाताची नासधूस केली आहे. दरम्यान, ओसरगांवातून हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील डिगसच्या दिशेने वळवला आहे. त्या परिसरातही हत्तींनी नुकसान केल्याचे वृत्त आहे.
परतीच्या वाटेवर असलेल्या जंगली हत्तींनी रविवारी रात्री ओसरगांव परिसरात नुकसान केले. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सभापतींनी सोमवारी या नुकसानीची पाहणी केली.
कणकवली तालुक्यातून मालवण तालुक्यातील किर्लोसच्या दिशेने हत्तींना पिटाळण्यात आले होते. या हत्तींनी रविवारी रात्री ओसरगांव परिसरात नुकसान केले. भिवा मुकुंद पिळणकर यांच्या बागेतील नऊ माड हत्तींनी मोडून टाकले.
पिळणकर यांचे २२ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच वनिता अंकुश सावंत यांच्या घरानजीक ठेवलेल्या बारा भाताच्या पोत्यांची नासाडी हत्तींनी केली. त्यांचे १० हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा कृषी आणि वनविभागाने संयुक्तपणे पंचनामा केला.
मंडळ कृषी अधिकारी आर.आर.गावकर, वनअधिकारी इंदुलकर, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.राठोड, उपसरपंच सावंत, ग्रामसेवक आदी यावेळी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी ओसरगांव परिसरात हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी केली.
सध्या हत्तींचा वावर मानवी वस्तीत वाढला असून त्यांच्यावरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. हत्तींच्या हल्ल्यांमध्ये कित्येकजणांना आपला प्राण गमवावा लागला असून कित्येकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी या हत्तींचा बंदोबस्त करा अशाप्रकारच्या मागण्या निवेदनामार्फत प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र अद्यापही यावर ठोस उपाय न केल्याने हत्तींचा वावर आता माणगांव खोऱ्यातून ओसरगावच्या दिशेने वाढू लागला आहे.
दोन दिवसांपूर्वीच वैभववाडी, कणकवली या पट्ट्यात हत्तींनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता रविवारी रात्री ओसरगाव कानसळीवाडी येथे तीन हत्तींनी प्रवेश करत परिसर भयभीत करून सोडला आहे.
हत्ती आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या हत्तींनी तेथीलच एका शेतकऱ्याच्या पडवीत ठेवलेल्या भाताची नासधूस केली आहे. हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी
जिल्ह्यात हत्तींचा मानवी वस्तीत वावर वाढला असून नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हत्तींचे वाढते हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. हत्तीचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
वेताळबांबर्डेत ३५ माडांसह केळीचे नुकसान
कुडाळ तालुक्यात हत्तींकडून शेती-बागायतीचे नुकसान सुरूच आहे. रविवारी रात्री हत्तींनी वेताळबांबर्डे येथील सुमारे ३० ते ३५ माडांसह केळी-बागायतीचीही नुकसानी केली. हत्तींनी वेताळबांबर्डे येथील भोगलेवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील माडबागायतींची रविवारात्री नासधूस केली. यामध्ये तेथील रामचंंद्र गावडे यांचे १९ माड, रामा झोरे यांचे १६ माड तसेच रवींद्र बुधाजी गावडे यांच्या केळीच्या झाडांची नुकसानी केली. दरम्यान, हत्तींनी चालविलेल्या या नुकसानसत्रामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून लवकरात लवकर हत्ती हटाव मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.