परप्रांतीय बोटींना अटकाव करा
By Admin | Updated: February 25, 2015 00:09 IST2015-02-24T22:35:57+5:302015-02-25T00:09:18+5:30
मच्छिमारांची मागणी : मालवणात गेले दोन दिवस धुमाकूळ

परप्रांतीय बोटींना अटकाव करा
मालवण : महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात येऊन मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय बोटींविरोधात हर्णे बंदरात ‘सी वॉर’ पेटल्यानंतर या परप्रांतीय बोटींनी आपला मोर्चा मालवण बंदराकडे वळविला आहे. पोलीस आणि मत्स्य विभागाच्या अनास्थेमुळे परप्रांतीय बोटींचा धुमाकूळ वाढला आहे. येथील स्थानिक मच्छिमार परप्रांतीय बोटींचे अतिक्रमण खपवून घेणार नाहीत. हर्णे समुद्रातील ‘सी वॉर’ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने परप्रांतीय बोटींना अटकाव करणे आवश्यक आहे. अन्यथा मालवणच्या समुद्रात ‘सी वॉर’ पेटल्यावाचून राहणार नाही, असा इशारा येथील मच्छिमारांनी दिला आहे.मागील दोन दिवसांपासून मालवण समुद्रात परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुमाकूळ वाढला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग किल्ल्यानजिकच्या समुद्रात १० वावाच्या आत येऊन कर्नाटक- मलपी येथील २० ते २५ यांत्रिकी ट्रॉलर्स मासेमारी करताना आढळून आले. या ट्रॉलर्सला रोखण्यासाठी येथील पारंपरिक व यांत्रिकी मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांची भेट घेतली.हर्णे बंदरात झालेला संघर्ष टाळण्यासाठी तातडीने शासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी घारे यांनी केली. सहाय्यक मत्स्य आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी परप्रांतीय बोटींविरोधात गस्तीची मोहीम हाती घेऊ, असे आश्वासन दिले. मच्छिमारांनी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्याशीही संपर्क साधून माहिती दिली. यावेळी भाऊ मोर्जे, विकी चोपडेकर, पिटर मेंडीस, महेश दुदम, रॉकी डिसोझा, संतोष देसाई यांच्यासह मच्छिमार बांधव उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पारंपरिक पद्धतीची मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. येथील समुद्र मत्स्य व्यवसायास पोषक आहे. मागील काही दिवसांपासून या भागात परप्रांतीय बोटींचे अतिक्रमण वाढले आहे. या बोटींना रोखण्यास मत्स्य विभाग अपयशी ठरला आहे. मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. परप्रांतीय बोटींना रोखण्यास पोलीस यंत्रणाही कमी पडली आहे. परप्रांतीय बोटींना वेळीच रोखणे आवश्यक आहे. मत्स्य विभागाने यासाठी पोलिसांच्या मदतीने सागरी मोहीम आखणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करायला स्थानिक मच्छिमारांची तयारी आहे. शासकीय यंत्रणेने परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखण्यास अनास्था दाखविल्यास मच्छिमार आपल्या पद्धतीने या बोटींना पकडण्यासाठी पावले उचलणार आहेत.
- दिलीप घारे, सचिव, श्रमजीवी रापण संघ