गुहागर तालुका आमसभेत ६७ निवेदने
By Admin | Updated: May 29, 2015 23:45 IST2015-05-29T22:20:39+5:302015-05-29T23:45:43+5:30
गाजण्याची शक्यता : आमसभेत बांधकाम खात्यांकडे सर्वाधिक लक्ष

गुहागर तालुका आमसभेत ६७ निवेदने
असगोली : गुहागर पंचायत समितीची आमसभा सोमवार, ८ जून रोजी सकाळी ११ वाजता भंडारी भवन सभागृहामध्ये होणार आहे. आमसभेसाठी तालुक्यातून केवळ ६७ निवेदने देण्यात आल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा होणार असून, त्यात सर्वाधिक म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला २६ निवेदने प्राप्त झाली आहेत. पालकमंत्री असताना गुहागर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला होता. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांकडे सर्वाधिक निवेदने देण्यात आली आहेत. एकूण निवेदनामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग २६, सार्वजनिक बांधकाम विभाग ९, महाविद्युत प्रकल्प ९, पंचायत समिती गुहागर ६, शिक्षण विभाग पंचायत समिती २, ग्रामीण पाणीपुरवठा २, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण २, पतन अभियंता ४, दूरध्वनी कार्यालय ३, तहसीलदार कार्यालय १, एस. टी. महामंडळ २ विभागवार संस्थेचा समावेश आहे.
आजही मुख्य रस्त्यासाठीच जनतेची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यामध्ये या रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. झालेली कामे ही दर्जाहीन होत असल्याने या कामांच्या बाबतीत वारंवार तक्रारी केल्या जातात.
यामुळेच या निवेदनांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. शिक्षण, महसूल अशा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. केवळ रस्ते म्हणजे विकास ही भावना तालुक्यातील जनतेची झाल्याने इतर विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनांवरुन स्पष्ट होत आहे. मागील आमसभेचा इतिवृत्त हा जिल्ह्यातू एकूण ४८ शासकीय कार्यालयांना पाठविण्यात आला होता. एवढी कार्यालये जनतेच्या विकासासाठी कार्यरत असतानाही केवळ ६७ निवेदने प्राप्त होतात, याचा अर्थ एकतर समस्या नाहीत किंवा या विभागांबाबत थेट संपर्क जनतेशी येत नसल्याने कोणतीही अडचण नाही, असे मत व्यत केले जात आहे. आमसभेत यावेळी बांधकाम खात्यावर चर्चा होणार असून तालुक्याचा विकास झपाट्याने होत असला तरी तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर अद्यापही मोठा खर्च होत असल्याने व रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने विकास केवळ रस्त्यांपुरताच मर्यादीत राहणार काय असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)
गुहागरच्या दि. ८ जूनला होणाऱ्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा शक्य
माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांच्या भूमिकेकडे लक्ष लागणार.
वभागातील अनेक अधिकाऱ्यांची भांडाफोड केली जाण्याची शक्यता.
आमसभेबद्दल मोठी उत्सुकता असल्याने गर्दी होणार.