मालवण : देवबाग गावावर नारायण राणे यांचे विशेष प्रेम नेहमीच दिसून आले. १९९० साली किनारपट्टीवर बंधारा उभारून त्यांनी गाव सुरक्षित केला. रस्ते केले, सुविधा दिल्या. गावाने पर्यटनातून क्रांती केली. येत्या दोन वर्षात या ठिकाणी दर्जेदार बंधारा तयार होईल. प्रत्येक तीन महिन्यांनी आपण त्याची पाहणी करू. आमची बांधिलकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेशी असून, जनतेचे सेवक म्हणूनच आम्ही काम करत राहणार, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी देवबाग येथे व्यक्त केले.महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यित शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे, या कामासाठी १५८ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवबाग विठ्ठल मंदिर येथे खाडी किनारी झाला.यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, बबन शिंदे, विश्वास गांवकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, संजय पडते, देवबाग उपसरपंच ताता बिलये, विलास बिलये, दत्ता चोपडेकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.
दहा वर्षांचा बॅकलॉग भरायचा आहे : नीलेश राणेआमदार नीलेश राणे म्हणाले, मालवण-कुडाळ मतदारसंघात मागील दहा वर्षांत काहीच आले नाही. बॅकलॉग खूप मोठा आहे. तो भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. महायुती सरकार माध्यमातून मोठा निधी येत आहे. एका देवबाग गावासाठी एकाचवेळी १५८ कोटी मंजूर झाले ही खूप समाधानाची बाब आहे. मात्र अनेक कामे करायची आहेत. ही सुरुवात आहे.
सर्व कामे दर्जेदार होणारमहाराष्ट्र सागरी महामंडळ हा बंधारा बांधणार असून, दर तीन महिन्यांनी भेट देऊन जिल्ह्यातील प्रत्येक कामाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व कामे दर्जेदार होणार असल्याचे पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.