पालकमंत्री कंपनीचे की आरोंदावासीयांचे?
By Admin | Updated: January 14, 2015 00:34 IST2015-01-13T23:02:34+5:302015-01-14T00:34:25+5:30
संदेश सावंत : तेलींचीही चौकशी करा

पालकमंत्री कंपनीचे की आरोंदावासीयांचे?
सावंतवाडी : पालकमंत्री दीपक केसरकर हे आमच्याच दालनात आले, आमचा सत्कार स्वीकारला आणि सायंकाळी आम्हालाच अटक करण्यास सांगितली. त्यामुळे केसरकर हे नेमके आरोंदावासीयांच्या बाजूने आहेत की जेटीच्या बाजूने, असा सवाल जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी केला. जिल्हा परिषदेत पूर्वी भ्रष्टाचार असेल, तर त्यात तेलीही सामील होते का, याचीही चौकशी करा, अशी मागणीही सावंत यांनी यावेळी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे सावंतवाडीत आले असता त्यांनी येथील पंचायत समिती सभापतीच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, सभापती प्रमोद सावंत, शहराध्यक्ष मंदार नार्वेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संदेश सावंत म्हणाले, ज्या दिवशी आरोंदा प्रकरण घडले, त्यावेळी मी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्थायी समितीसोबत आलो होतो. मला अटक होणार हे माहीत नव्हते. अन्यथा मी लाल दिव्याची गाडी आणली नसती, असे सांगत पोलिसांच्या कारवाईनंतर मी गाडी घेऊन आलो नाही, असा खुलासाही यावेळी सावंत यांनी केला.
आम्ही स्थायी समिती म्हणून जेटी कंपनीने अडविलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. या रस्त्यावर पूर्वी जिल्हा परिषदेचा निधी खर्ची पडला असून, आता तो रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आमचा तो अधिकार असून आमचा दौरा पूर्वनियोजितच होता, असे सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दौऱ्यात अधिकारी आले नाही, यावरून राजकारण करणे योग्य नाही, असा खुलासा त्यांनी केला.
जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे राजन तेली यांनी तक्रार करावीच. कारण तेही पूर्वी आमच्यातच होते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे कदाचित तेही भ्रष्टाचारात सामील असतील, असा टोला सावंत यांनी तेली यांना लगावला. (प्रतिनिधी)
भिंत पाडणारच; लक्ष प्रशासनाच्या कारवाईकडे
राज्यमार्ग अडवून जेटी कंपनीने घातलेली भिंत पाडण्याचा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी इशारा दिला होता. अधिकाऱ्यांनी ही भिंत अनधिकृत असून आम्हीच पाडतो, असे राणे यांना सांगितल्याने आम्ही थांबलो आहोत. भिंत त्यांनी नाही पाडली, तर आम्हाला पाडावीच लागेल, असा इशाराही सावंत यांनी दिला.