तक्रार निवारण दिनातून लोकांपर्यंत पोहोचणार

By Admin | Updated: January 5, 2015 23:22 IST2015-01-05T22:36:35+5:302015-01-05T23:22:25+5:30

प्रत्येक शनिवारी नागरिकांना भेटणार : प्रमोद मकेश्वर

Grievances can reach people through redressal day | तक्रार निवारण दिनातून लोकांपर्यंत पोहोचणार

तक्रार निवारण दिनातून लोकांपर्यंत पोहोचणार

चिपळूणचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर दर शनिवारी नागरिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करुन तक्रारीचे निवारण करणार आहेत. आम्हाला लोकांशी प्रत्यक्ष थेट संपर्क साधता येत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे ? त्यांच्या अपेक्षा काय? किंवा त्यांच्या तक्रारी आम्हाला समजत नाहीत. लहान-मोठे गुन्हे, किरकोळ तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या तर त्यावर मार्ग काढणे सोेपे जाईल व तक्रारीचे कायमचे निराकरण करता येईल, यासाठी शनिवारी सकाळच्या सत्रात ते तक्रारदारांना भेटणार आहेत. याबाबत प्रमोद मकेश्वर यांच्याशी साधलेला थेट संवाद..


जनतेची जान आणि माल रक्षणासाठी तत्पर
पोलीस हा जनतेचा सेवक आहे. कायदा आणि सुव्यवस्था याची सांगड घालून जनतेला भयमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. कोणतीही आपत्ती आली तरी कशाचीही पर्वा न करता सर्वप्रथम पोलिसालाच तेथे पोहोचावे लागते. त्यामुळे सुखदु:खाच्या क्षणी सर्वस्व झोकून देऊन आपले कर्तव्य बजावणारा पोलीस हाही माणूस असतो.
जनतेने त्याच्याशी समन्वय साधून सौहार्दपूर्ण वागले पाहिजे. पोलीस आपला मित्र आहे, असे समजले पाहिजे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय... या ब्रीदाप्रमाणे पोलीस कार्यरत असतो.
पोलिसांबाबत जनतेत अनेक गैरसमज आहेत. पोलिसांची लोकांना भीती वाटते त्याबाबत काय सांगाल?
- पोलीस हा कायद्याचा रक्षक आहे. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता घरातील सणसूद विसरुन सामान्य माणसाच्या रक्षणासाठी तो कार्यरत असतो. आपले कर्तव्य बजावताना प्रत्येकाच्या मनासारखे त्याच्याकडून घडेलच असे नसते. शेवटी तोही माणूस आहे. काम करताना लहान-मोठ्या चुका घडतात. म्हणून पोलिसांबद्दल अनेक गैरसमज करुन शेरेबाजी केली जाते, हे चुकीचे आहे. चार-दोन लोक चुका करीतही असतील म्हणून संपूर्ण खातेच बदनाम आहे, असे नाही. लोकांनीही याबाबत समजून घेतले पाहिजे. पोलिसांना वेळच्या वेळी सहकार्य करायला हवे. पोलिसांबाबत असलेले गैरसमज दूर करुन पोलीस हा जनतेचा मित्र आहे हे पटवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कारण जनता आणि पोलीस यांच्यात समन्वय असेल तरच अधिक गतीने काम करता येईल, असे मला वाटते. आपला तसा प्रयत्न राहणार आहे.
शहरात सध्या वाहतुकीची कोंडी होत आहे, याबाबत काय उपाययोजना?
- शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच येथील फेरीवाले रस्त्यावर बसतात. आम्ही सातत्याने त्यांना मागे सरकण्यास भाग पाडतो. परंतु, आमची पाठ फिरली की, त्यांचे ये रे माझ्या मागल्या सुरु होते. याबाबत नगर परिषदेने ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. आमच्या निदर्शनास आले की, आम्ही कारवाई करतोच. शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी आमचे वाहतूक पोलीस दक्ष आहेत. शिवाय या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी, यासाठी आम्ही अभ्यास सुरु केला आहे. वाहतुकीच्या कोंडीतून लोकांना मुक्ती कशी मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु, रस्त्यावर बसणारे फेरीवाले, व्यापारी, वाहनचालक यांनीही आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
न्यायालयीन कामकाजाचा आढावा आपण कसा घेता?
- पोलिसांकडून काही गुन्ह्यांचा योग्य तपास होत नाही किंवा गुन्ह्याला अनुसरुन कागदपत्र सादर न करणे, तपासी अधिकारी न्यायालयात हजर न राहणे किंवा योग्य पद्धतीने तपास न करणे अशा किरकोळ त्रुटींचा आरोपीला फायदा होत असतो. याबाबत आपण लक्ष घातले असून, न्यायालयात किती केस चालणार आहेत, कोणत्या कोर्टात कोणती केस आहे, त्यामध्ये कोण कोण वकील आहेत, सरकरी वकील कोण, साक्षीदार किती, शिवाय आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत, किती केसेस बोर्डवर आल्या, किती यायच्या आहेत, किती केसमध्ये तडजोड झाली, याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
रेझिंग डे व फसवणुकीबाबत काय सांगाल?
- आज विविध मार्गानी किंवा मोबाईल फोनद्वारे जनतेकडून एटीएमचा पिनकोड किंवा इतर माहिती मागवून त्यांची फसवणूक केली जाते. काही कंपन्या आमिषे दाखवून लूट करतात. यासाठी जनतेत जागृती करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. ‘रेझिंग डे’च्या माध्यमातून सुसंवाद साधून पोलिसांबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो दि. ८ पर्यंत चालणार
आहे. वेगवेगळ्या मार्गानी जनतेत जागृती व्हावी व पुन्हा पुन्हा होणाऱ्या चुका टाळून आपली फसवणूक टाळावी. तसेच काही संशयित वस्तू, व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असा आपला उद्देश आहे.
- सुभाष कदम

गुन्हेगारी कमी व्हावी, गुन्ह्यांची संख्या घटावी, शहरातील भुरट्या चोऱ्या, किरकोळ हाणामाऱ्या नियंत्रित व्हाव्यात, यासाठी फिक्स पॉर्इंट किंवा सातत्याने गस्त घातली जात आहे.
गुन्हे प्रकटीकरण शाखे (डीबी) चे कर्मचारीही सतर्क ठेवलेले आहेत.
सर्वसामान्य जनतेला सुखा समाधानाने व भयमुक्त जगता यावे, यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्नशील आहोत.
शहरातील गस्त वाढविण्यात आली आहे.

Web Title: Grievances can reach people through redressal day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.