ग्रामसेवकांनी कामाचा वेगळा ठसा निर्माण करावा
By Admin | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-29T22:33:52+5:302015-12-30T00:45:43+5:30
संदेश सावंत : सिंधुदुर्गनगरीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण, २३ ग्रामसेवकांचा समावेश

ग्रामसेवकांनी कामाचा वेगळा ठसा निर्माण करावा
सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपुलकी निर्माण करत कामाचा वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी मंगळवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले.
स्वच्छ भारत मिशन मार्गदर्शन कार्यशाळा व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शरद कृषी भवन येथे झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती , ग्रामसेवक, स्वच्छता करंडक वक्तृत्व स्पर्धा विजेते विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. तर ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात संदेश सावंत यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचे अभिनंदन केले. ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले. मात्र ग्रामसेवकांनी समोरच्याच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करावा व कार्याचा वेगळा ठसा उमटवावा असे आवाहन केले आहे. शेखर सिंह म्हणाले, ग्रामसेवकांनी जनतेशी नम्रतापूर्वक व्यवहार ठेवावेत. प्रशासनाची प्रतिष्ठाही ग्रामसेवकांवर अवलंबून आहे. त्यामुळे चुकून झालेल्या चुकीला निश्चित क्षमा असेल पण जाणून बुजून केलेल्या चुकीला क्षमा असणार नाही. असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ग्रामसेवक हा जनता व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले तर सभापती चौगुले यांनी महिला ग्रामसेवकांनी पुरस्कारात ५० टक्के आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, या आशीर्वादामुळे आत्मविश्वास जबाबदारी वाढली आहे. चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र व वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कनिष्ठ गटात आलिशा जॅकी फेराव (प्रथम), सौंदर्या सोनू शेळके (द्वितीय), जागृती मोहन राणे (तृतीय), तर वरिष्ठ गटात अनुक्रमे समृद्धी श्रीकृष्ण पेडणेकर, पूजा संतोष पाटणकर, गितांजली गुरूनाथ पेडणेकर. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. समृद्धी हिंने मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेसाठी कृतीशिलतेतून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)
२३ ग्रामसेवकांचा सत्कार
संदिप पाटील, मुकुंद परब, विलास केळूूसकर, अपर्णा पाटील, अरूण जाधव, दीपक तेंडूलकर, रतिलाल बहिराम, दीपक अमृतसागर, पंढरीनाथ पांढरे, संदिप गोसावी, आनंद परूळेकर, रघुनाथ भोगटे, चंदू रावले, मंगेश राणे, राजेंद्र भुर्के, विनोद हेरवाडे, जनार्दन खानोलकर, मंगल गवळी, विवेक वजराटकर, आदम शहा, दिनेश चव्हाण, गिरीष धुमाळे, संजय शेळके, गोकुळ कोकणी यांचा सत्कार करण्यात आला.