शासकीय कार्यालयांची स्वच्छता
By Admin | Updated: November 11, 2014 23:22 IST2014-11-11T22:18:29+5:302014-11-11T23:22:16+5:30
देवगड तालुक्यातील स्थिती : स्वच्छ भारत अभियान

शासकीय कार्यालयांची स्वच्छता
पुरळ : स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने देवगड तालुक्यामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून यामुळे शासकीय कार्यालये स्वच्छ झाली आहेत.
देवगड तहसीलदार कार्यालय, देवगड पोलीस ठाणे, विजयदुर्ग पोलीस ठाणे, तालुक्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पशुदवाखाने, मंडळ अधिकारी कार्यालये, अंगणवाड्या या ठिकाणी स्वच्छ भारत अभियानाने कार्यालयांमध्ये साफसफाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छतेचा नारा हातात घेतला आहे. संपूर्ण देशामध्ये शासकीय कार्यालयांमध्ये सार्वजनिक ठिकाणी समाजसेवक, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. देवगड पोलीस ठाण्यामध्ये निरीक्षक अरविंद बोडके व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण पोलीस ठाणे व परिसराची स्वच्छता केली. तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक शाळांमध्ये दिवाळीची सुट्टी संपल्यावर शाळा सुरू होताच शाळेचा परिसर स्वच्छ भारत अभियानाचे आदेश पालन करून स्वच्छ करण्यात आला. यामुळे शिक्षकांच्या हातात पहिल्यांदाच झाडू पाहिल्याचे दिसून येत होते. विद्यार्थीही यात सहभागी झाले होते.
तसेच तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये ६ मंडल निरीक्षक कार्यालये, आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र, पशु दवाखान्यांमध्ये साफसफाई करून स्वच्छता मोहीमेचे पालन केल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयामध्ये टेबल-खुर्च्या, कपाटे स्वच्छ करण्यात आली. संगणकामधील अनावश्यक माहिती काढून टाकण्यात आली. भिंतीवरील अनावश्यक पत्रव्यवहार काढून टाकण्यात आले. जुन्या दप्तरांचे वर्गीकरण करताच हे दप्तर नवीन कापडांमध्ये बांधण्यात आले. ग्रामपंचायतींच्या शौचालयांचीही साफसफाई करण्यात आली. शाळांमधील अनावश्यक साहित्यांचे निर्लेखन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जुने खराब झालेले शैक्षणिक साहित्य जाळण्यात आले व नवीन साहित्याची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. तर काही शाळांनी स्वच्छतेच्या प्रबोधनासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभातफेरी काढली.
अंगणवाडीमध्येही जुन्या साहित्याचे निर्लेखन करण्यात आले. यामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आल्यामुळे कार्यालये स्वच्छ झाली आहेत. विजयदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांनी स्वत: हातात झाडू घेऊन पोलीस स्टेशन व परिसर कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छ केला.
स्वच्छ भारत अभियान देशभर राबवले जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये या योजनेची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच देवगड पवनचक्कीजवळ विजयदुर्ग किल्ल्यावर व त्या- त्या गावातील तिठ्यांवर प्लास्टिकच्या व दारुच्या रिकाम्या बाटल्या प्रचंड प्रमाणात असल्याचे दिसून येते. याची स्वच्छता न केल्यास पर्यटनाला खीळ बसू शकते. (वार्ताहर)
नदी, ओहोळ परिसर स्वच्छ झाला पाहिजे
देवगड तालुक्यामध्ये नदी व ओहोळांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यामध्ये पालापाचोळा साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. तेथे स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली तर खरोखरच स्वच्छता अभियान सफल होऊन भारत स्वच्छ होऊ शकतो. स्वच्छता अभियान हे एखाद्या वार्षिकासारखे असता कामा नये. ते दरवर्षी राबविले गेले पाहिजे. तरच देश खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत होईल.