गोर बंजारा समाज एकवटणार
By Admin | Updated: August 28, 2016 00:25 IST2016-08-28T00:25:12+5:302016-08-28T00:25:12+5:30
जिल्हा मेळावा : समस्या न सुटल्यास मंत्रालयावर धडकण्याचा इशारा

गोर बंजारा समाज एकवटणार
मंडणगड : गोर बंजारा या भटक्या समाजाला न्याय देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.़ त्यामुळे जातीच्या दाखल्यासह, पडताळणी, रेशनकार्डच्या समस्या, राहण्याच्या समस्या या समाजाला भेडसावत आहेत. कामधंद्यासाठी सर्वत्र विखुरलेल्या समस्त गोर बंजारा समाजाला एकत्र आणण्यासाठी रत्नागिरी येथील श्री साई मंगल कार्यालयात गोर बंजारा बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ या समाजाने आता आपल्या हक्कांसाठी आक्रमक होण्याचे ठरवले असून, शासनाने न्याय न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा गोर बंजारा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.
गोर बंजारा समाजाच्या गीता राठोड यांनी बंजारा समाजातील लोकांना तालुकानिहाय एकत्र आणण्यासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी जिल्ह्यातील गोर बंजारा समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. या मेळाव्यामध्ये समाजाशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संत सेवालाल यांच्या भक्तीने व प्रेरणेने बंजारा समाज आज एकत्र येत आहे. हा समाज संपूर्ण राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. काही राज्यांमध्ये हा समाज अनुसूचित जाती, जमातींमध्ये समाविष्ट आहे तर अनेक ठिकाणी या भटके विमुक्तांमध्ये त्याचा समावेश करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोर बंजारा समाजातील कुटुंबे ही मोठ्या प्रमाणात मजुरीच्या निमित्ताने विखुरली आहेत. पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना जीवन मरणाच्या लढाईत आजही हा समाज अनेक अडचणींचा सामना करत आहे.
जातीचा दाखला, शिधापत्रिका, अधिवासाचे दाखले मिळवण्यात या समाजाला मोठ्या अडचणी येत आहेत. याबाबत ठोस उपाययोजना करुन शासनाने या समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली़ राम पवार यांनी समाजाच्या एकजुटीचे महत्व सांगतानाच समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. सामाजिक न्याय हक्कांच्या या लढाईत यश मिळवायचे असेल तर सर्व समाजबांधवांनी एकत्र राहूनच लढा देऊया, असे आवाहन पवार यांनी केले़ सुरेश चव्हाण यांनीही समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
मेळाव्याला गीता राठोड, अप्पा राठोड, सतीश राठोड, मीराबाई राठोड, जयराम राठोड, ़प्रियांका राठोड, विजय चव्हाण, शिव राठोड, डी. एम. चव्हाण, ईश्वर राठोड, संजय राठोड, महेंद्र राठोड उपस्थित होते.