मतिमंदांच्या आयुष्यात सोनेरी पहाट
By Admin | Updated: July 31, 2014 23:20 IST2014-07-31T22:30:16+5:302014-07-31T23:20:42+5:30
आविष्कार : बुद्धिउपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल २८ वर्षांची धडपड

मतिमंदांच्या आयुष्यात सोनेरी पहाट
शोभना कांबळे - रत्नागिरी ,, सामान्य मुलांना घडवताना शिक्षकांची मोठी कसरत होते. त्यापेक्षा अधिक मेहेनत ज्या विद्यार्थ्यांचा मानसिक विकास खुडलेला आहे, ज्यांचा बुद्ध्यांक अतिशय कमी आहे, अशा मुलांना घडवताना, त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी सक्षम बनवताना घ्यावी लागते. हे आव्हानात्मक असे काम पेलणारी, अशा मुलांचे आयुष्य प्रकाशमय करणारी प्रशिक्षित शिक्षक मंडळी रत्नागिरीत आविष्कार संस्थेच्या माध्यमातून तयार झाली आहेत. त्यामुळेच अशा मतिमंद मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उगवत आहे. रत्नागिरीतील आविष्कार संस्था गेली २८ वर्षे मतिमंद मुलांचे भविष्य प्रकाशमान करण्यासाठी झटत आहे.
शमीन शेरे या १९८४मध्ये रत्नागिरीतील निरीक्षण व बालगृहात केस वर्कर म्हणून काम पाहात होत्या. या कामाशी संबंधित अशा गावांमध्ये सर्वेक्षण करतानाच त्यांना १०० मुलांमध्ये मतिमंदत्व असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यात या मुलांसाठी एखादी तरी शाळा असावी, या गरजेतून डॉ. अलिमिया परकार, अॅड. बाबा परूळेकर, डॉ. अरूण फाटक, डॉ. शाश्वत शेरे, नीला पालकर, डॉ. यशवंत माईणकर आदी सहृदयी मंडळींच्या सहयोगाने १९८६मध्ये आविष्कार संस्थेची स्थापना झाली. शमीन शेरे आणि वीणा माईणकर या दोघींनी त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही घेतले. शाळेत विद्यार्थी दाखल करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर पालकांच्या गाठीभेटी घेणे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. पहिल्या वर्षी नऊ विद्यार्थी या शाळेत नोंदवले गेले. त्यानंतर मात्र हळूहळू विद्यार्थी मिळू लागले. मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असलेली कोकणातील ही पहिलीच शाळा असल्याने तिला १९८६ मध्येच ५० मुलांसाठी शासनाची मान्यता मिळाली. त्यासाठी प्रशिक्षित शिक्षकवर्ग मिळणे अवघड होते. पण, तेही आव्हान संस्थेने पेलले.
गेली २८ वर्षे ही शाळा मतिमंद मुलांच्या विकासाबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी झटत आहे. आता संस्थेची स्वमालकीची आकर्षक इमारतही आहे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांमधून या मुलांचा भाषा विकास होतानाच त्यांना गणित आणि सामान्य विज्ञानाचे ज्ञान मिळत आहे. दुकान प्रकल्पासारख्या अभिनव उपक्रमातून त्यांचे विक्री कौशल्य तसेच गणिती कौशल्य विकसित होत आहे. त्यांच्यातील हस्तकौशल्याचा विकास होत असल्याने आज आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आकाशकंदील, मेणबत्या, पर्स, पणत्या तसेच हस्तकलांमधून विविध या आकर्षक वस्तू अगदी गणेशमूर्तीही ही मुले लिलया बनवत आहेत. संस्थेने प्रदर्शनाच्या माध्यमातून या मुलांना व्यासपीठ मिळवून दिल्याने त्यांच्या वस्तूंची चांगल्या प्रकारे विक्री होत आहे. त्यामुळे आपोआप ती स्वावलंबी बनत आहेत. विविध सण, कार्यक्रम, वाढदिवस साजरे करण्यात या मुलांचा सहभाग असल्याने त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे या मुलांची क्रीडाक्षेत्रातील कामगिरी तितकीच वाखाणण्याजोगी आहे. अनेक मुले जिल्हा, राज्य अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत चमकली आहेत. इतर मुलांइतकीच ही मुलेही आपल्या बुद्धीची चमक दाखवत आहेत.
आपले मूल आहे त्याच स्थितीत आपल्याला कायम सांभाळायचे आहे, अशी पालकांची पूर्वी मानसिकता होती. मात्र, आता आपल्या मुलांच्या चढत्या प्रगतीचा आलेख त्यांना स्तीमित करतोय. यामध्ये अर्थातच त्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकवर्गाचे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच समाजात उपेक्षित ठरलेली ही मुले समाजासमोर सन्मानाने येत आहेत. त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोनेरी पहाट होत आहे.
पुनर्वसनासाठी धडपड...
आविष्कार संस्थेत आज अगदी ३ वर्षांपासूनची मुले आहेत. १८ वर्षांवरील मुलांना विविध वस्तू बनवण्याचे व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे. यासाठी संस्थेच्या शाळेबरोबरच कार्यशाळेतही या मुलांना सामावून घेतले जात आहे. त्यांच्या हातातील जादू पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या मुलांसोबत येणाऱ्या पालकवर्गालाही संस्थेने त्यांच्या शाळेतील वेळेचा सदुपयोग करून दिला आहे. या पालकांना घरगुती शिक्षण देण्यासाठी संस्था अभ्यासक्रम देते. शाळेतील बहुतांश मुलांचे पालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. त्यामुळे पालकांचे बचत गट उभारून त्यांच्याही अर्थार्जनात संस्था हातभार लावत आहे. या मुलांच्या पुनवर्सनाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे भविष्यात पुनर्वसनविषयक संशोधन केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.