लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

By Admin | Updated: November 19, 2014 23:25 IST2014-11-19T22:14:12+5:302014-11-19T23:25:58+5:30

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचना

Go to the people and solve their problems | लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवा

प्रमोद जठार : मालवणातील जनता दरबारात भाजप कार्यकर्त्यांना सूचना
मालवण : देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आली आहे. तुम्ही आता विरोधी पक्षातले कार्यकर्ते राहिला नसून सत्ताधारी पक्षाचे घटक बनला आहात. गावागावात, वाडीवाडीत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. भाजपा सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडविण्यात आले पाहिजेत. लोकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घ्या, अशा सूचना माजी आमदार प्रमोद जठार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केल्या.
येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, विलास हडकर, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, आबा तारी, जनार्दन सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जठार म्हणाले, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आम्ही सर्वजण याठिकाणी आलो आहोत. तुम्ही आता बलाढ्य सरकारचे कार्यकर्ते असल्याने तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आता सरकार असल्याने तुम्हाला आता राज्य करायचे आहे. सरकारची पावले प्रत्येक वाडीवस्तीत उमटविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्याचे जाळे निर्माण झाले पाहिजे. यापूर्वी राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा सत्तेत आमचा फक्त ४० टक्के वाटा होता. आता शत प्रतिशत भाजपाचे सरकार असल्याने शत प्रतिशत पदे भाजपच्याच कार्यकर्त्यांना मिळणार आहेत. जिल्ह्यात आपली ताकद कमी आहे. येथे आपला एकही आमदार निवडून आलेला नसला तरीही सत्तेची अशी संधी यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षवाढीसाठी हीच वेळ असून कामाला लागा. लवकरच जिल्ह्यात भाजपाचा पालकमंत्री ठरणार असल्याचेही जठार म्हणाले.
जनता दरबारात नागरिकांनी सीआरझेडचा प्रश्न, आचरा येथील देवस्थान इनाम जमिनी, सवलतीच्या दरात केरोसिन, अनधिकृत पर्ससीन, गौण खनिज याबाबत प्रश्न मांडले. मुंबईऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक व्हावे या जठार यांच्या मागणीचेही यावेळी त्यांना स्मरण करून देण्यात आले. (प्रतिनिधी)

मालवण येथील हॉटेल महाराजा येथे नागरिकांसाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतुल काळसेकर, राजन तेली, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.

 

Web Title: Go to the people and solve their problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.