विकासकामात जिल्ह्याला न्याय देणार
By Admin | Updated: January 7, 2015 23:59 IST2015-01-07T22:12:51+5:302015-01-07T23:59:16+5:30
रवींद्र वायकर : शिवसेनेतर्फे नूतन पालकमंत्र्यांचा रत्नागिरीत सत्कार

विकासकामात जिल्ह्याला न्याय देणार
रत्नागिरी : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर सोपवली आहे. जिल्ह्यात विकास करायला भरपूर वाव आहे. त्यासाठी मुंबईत ज्या व्हिजनने आपण काम केले, त्याच व्हिजनने जिल्ह्यातही विकासाची कामे केली जातील. कोणती कामे करायला हवीत, हे लोकांनी सांगण्यापेक्षा लोकांना कोणती कामे हवी आहेत, हे मला समजले पाहिजे तरच मी या जिल्ह्याला न्याय देऊ शकेन, असे उद्गार रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना काढले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पालकमंत्री वायकर यांचा सत्कार समारंभ व शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर वायकर हे प्रथमच रत्नागिरीत आले आहेत. यावेळी राजापूरचे आमदार राजन साळवी, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रमोद शेरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री वायकर यांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वायकर म्हणाले की, खेडमध्ये आपले घर असून, गेली ३० वर्षे मुंबईत राहूनही मी सातत्याने गावात येत होतो. मुंबईपेक्षा गावावर माझे प्रेम आहे. त्याहीपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या नावाने मला खूप काही दिलंय. मुंबई- जोगेश्वरीतून राजकीय कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर महत्त्वाच्या अनेक पदांवर काम केले. मुुंबई महापालिकेत स्थायी समिती सभापती असताना मुंबईच्या पाण्याच्या समस्येची उकल केली. रत्नागिरी जिल्ह्यातही कोयनेचे अवजल प्रचंड मोठ्या प्रमाणात वाशिष्ठी नदीत मिळाल्यानंतर समुद्रात जाते. या पाण्याचा चिपळूण परिसरासाठी उपयोग व्हावा, असे आपले प्रयत्न राहणार आहेत.
पालकमंत्री म्हणून माझ्याकडून जिल्हावासीयांच्या खूप अपेक्षा असणार हे साहजिक आहे. त्यामुळेच यापुढे जिल्ह्यात आल्यावर नाले, रस्ते, गटारे हे सिमेंट काँक्रिटचे झालेले दिसले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शहरांचा विकास महत्त्वाचा आहेच, गावांचाही विकास तितक्याच जोरकसपणे करणे आवश्यक आहे. शहर आणि गावांमध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण व्हायला हवी, त्यावर आपला भर राहील. तसेच दूषित पाणी समुद्राला जाऊन मिळणे योग्य नाही, अशा पाण्यावर प्रक्रिया आवश्यक आहे.
शास्त्रज्ञांच्या एका कार्यक्रमात आपल्याला बोलण्याची संधी मिळाली. अनेक शास्त्रज्ञ पीएचडी घेतलेले लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. केवळ शास्त्रज्ञ झाल्याने काम संपत नाही, तर शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. दापोली कृषी विद्यापीठ जिल्ह्यात आहे. येथे अनेक वैज्ञानिक आहेत, कृषितज्ज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत काय केलं की, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या उत्पन्नात भर पडली. येथे भाताचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय केलं? हापूसमधील साका या समस्येबाबत संशोधन करुन समस्या सोडविली का? शास्त्रज्ञ हा केवळ विद्यापीठ व संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहे म्हणून सांगण्यापुरता असता कामा नये, तर तो शेतकऱ्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचला पाहिजे. (प्रतिनिधी)
सर्व पक्षांतील राजकीय लोकांनी कोकणच्या विकासासाठी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. राजकारणासाठी फक्त निवडणुकीचा एक दिवस राखून ठेवावा. अन्यवेळी केवळ जिल्ह्याच्या विकासाचाच विचार प्रत्येक पक्षातील राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही करायला हवा. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे, असे वायकर म्हणाले. यावेळी आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि सचिन कदम यांनी आपले विचार मांडले.
उपयोग हवा...
जिल्ह्यात पायाभूत सुविधा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यासाठी आपण पालकमंत्री म्हणून प्रयत्नशील राहणार आहोत. महामार्गावर ट्रामा केअर सेंटर्स सुरु झाली. पण, त्याचे काम खरोखरच योग्य पद्धतीने चालते का? तेथे रुग्णवाहिका किती आहेत. डॉक्टर्स उपलब्ध असतात की नाही, याकडे यापुढे सर्वांनीच काटेकोरपणे लक्ष द्यायला हवे. या यंत्रणा शोभेच्या नाहीत तर त्याचा जनतेला उपयोग व्हायला हवा, असे वायकर म्हणाले.