सानुग्रह अनुदान द्या
By Admin | Updated: October 30, 2015 23:20 IST2015-10-30T22:06:05+5:302015-10-30T23:20:05+5:30
चिपळूण पालिका : कायम आस्थापना कर्मचाऱ्यांची मागणी

सानुग्रह अनुदान द्या
चिपळूण : दिवाळी काही दिवसांवर आली असून, नगर परिषदेतील कायम आस्थापनेवरील १९० कर्मचाऱ्यांना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये दिवाळी सणापूर्वी २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.
चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी ११.३० वाजता श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत २७ विषय ठेवण्यात आले आहेत. शहरातील मुख्य ११ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यांचे काम नगरोत्थान योजनेअंतर्गत केले जाणार आहे.
यासाठी ३ कोटी ३५ लाख ७८ हजार ९३१ रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी घेतली जाणार आहे.
नगर परिषद हद्दीमध्ये विविध महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी अंदाजपत्रक तयार केले जाणार असून, येणाऱ्या खर्चाबाबत व धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. शहर व परिसराला खेर्डी व गोवळकोट पंपहाऊस येथून पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मीटर बसवले जाणार आहेत. यासाठी पाणीपुरवठा विभागप्रमुखांनी दिलेल्या रिपोर्टवर योग्य निर्णय घेऊन नळांना मीटर बसवावेत अथवा कसे, यावरही चर्चा होणार आहे. (वार्ताहर)
निविदेवर चर्चा : सर्वसाधारण सभा २ रोजी
नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १ मुरादपूर भोईवाडी येथील महिला बालकल्याण केंद्राची इमारत बांधण्याचा ठेका मंगेश खोत यांना देण्यात आला होता. परंतु, त्यांनी हे काम पूर्ण न केल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकीय ७ लाख ५३ हजार रुपयांच्या निविदेवर चर्चा केली जाणार आहे.
नगर परिषद आरोग्य विभागातर्फे घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी प्रत्येक नागरिकास २ प्लास्टिक बादल्या दिल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ७८ ते ८० लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. हा खर्च जिल्हा नियोजनकडून न मिळाल्यास नगर परिषद फंडातून खर्च करण्यासाठी आरोग्य निरीक्षक यांच्या रिपोर्टनुसार योग्य तो निर्णय यावेळी घेतला जाणार आहे.
दि. २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार शिक्कामोर्तब.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यावरही होणार चर्चा.
शहरातील मुख्य ११ रस्ते होणार हायटेक.