हत्ती नुकसानभरपाई पंधरा दिवसांत द्या
By Admin | Updated: January 14, 2015 00:32 IST2015-01-13T23:14:23+5:302015-01-14T00:32:43+5:30
वनपरिक्षेत्र कणकवली : काँग्रेसचा वन अधिकाऱ्यांना घेराव

हत्ती नुकसानभरपाई पंधरा दिवसांत द्या
कणकवली : वनपरिक्षेत्र कणकवलीमधील हत्तीबाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई येत्या पंधरा दिवसांत देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिला. जानवलीतील वनक्षेत्रपाल एस. आर. पाटील यांना घेराव घालण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश सावंत, पंचायत समिती सदस्य महेश गुरव, मिलिंद मेस्त्री आदींसह कार्यकर्त्यांनी वनक्षेत्रपाल पाटील यांना मंगळवारी सकाळी जानवली येथील कार्यालयात घेराव घालून जाब विचारला. गेल्या दोन वर्षांतील हत्ती बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अद्याप वाटप झालेले नाही. तसेच हत्ती अनेकदा तालुक्यात येऊन नुकसान करत आहेत. मात्र, त्यावर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी उपाययोजना केली जात नसल्याबद्दल विचारण्यात आले. पाटील यांनी २०१२-१३ पासूनची वन्यप्राण्यांपासून झालेल्या नुकसानभरपाईची आकडेवारी सादर केली. विभागात फक्त अकरा प्रकरणांतील ८३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देणे बाकी असून तीन वर्षांत १२४ प्रकरणांत ८ लाख ५२ हजार रुपये भरपाई दिल्याचे सांगितले. तसेच शिल्लक नुकसानभरपाई येत्या पंधरा दिवसांत दिली जाईल, असे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.
तुटपुंंजी नुकसानभरपाई
हत्तींकडून माडाचे नुकसान झाल्यास फक्त २४०० रूपये प्रती माड नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, नारळ देणारा एक माड हत्तीने तोडल्यास शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. त्यामुळे धरणग्रस्तांना ज्याप्रमाणे झाडाच्या वयोमानाप्रमाणे मोबदला मिळतो त्या धर्तीवर नुकसानभरपाईसाठी शासनाने धोरण ठरवण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत यांनी सांगितले.