गणेशोत्सवापूर्वी स्थानकावर सुविधा द्या
By Admin | Updated: July 9, 2015 23:57 IST2015-07-09T23:57:11+5:302015-07-09T23:57:11+5:30
विनायक राऊत : रेल्वेसंदर्भात कुडाळ येथे बैठक

गणेशोत्सवापूर्वी स्थानकावर सुविधा द्या
कुडाळ : गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील सोयीसुविधा सुरळीत करा व प्रवाशांना सुरक्षित प्रवास द्या, असे आदेश कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांना खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वेच्या संदर्भातील कुडाळ येथील बैठकीत दिले. यावेळी त्यांनी या दोन महिन्यात प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन खासदार राऊत यांना दिले.
कोकण रेल्वेच्या सोयी सुविधांबाबत व सुरक्षित प्रवासाबाबत आढावा घेण्यासाठी व सूचना करण्यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ रेल्वे स्टेशनच्या विश्रामगृहात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भानू प्रकाश तायल, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, उपसभापती आर. के. सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख दादा बेळणेकर, राष्ट्रवादीचे अमित सामंत, भास्कर परब, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, संजय भोगटे, छोटू पारकर उपस्थित होते. जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस व कडक उन्हाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून येथील रेल्वेस्थानकाच्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शेड उभारण्यात यावी. तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वे पोलीस नेमावेत, तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दलालांवर गुन्हा दाखल करावा, प्रकल्पग्रस्तांचा विचार करुन त्यांना नोकरीत समावून घ्यावे, रेल्वे रुळमार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, रेल्वे प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे अनेक प्रश्न उपस्थितांनी मांडले.
यावेळी राऊत यांनी सोयीसुविधा गणेशोत्सवाच्या पूर्वी निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
रेल्वे सुरक्षितच : तायल
कोकण रेल्वे मार्ग सुरक्षित आहे व या रेल्वे मार्गाची तपासणी रेल्वे मंत्री प्रभूंच्या उपस्थितीत रेल्वे रूळ सुरक्षा समितीने केलेली असून, सुरक्षित रेल्वे मार्ग असा अहवाल दिलेला आहे. असे आतापर्यंत सुरक्षेसाठीच ६०० कोटी रूपये रेल्वेने खर्च केले असून, कोणीतरी उगाचच रेल्वेरूळ सुरक्षित नाही, असे सांगून अपप्रचार करू नये, असे तायल म्हणाले.
रुग्णालय कुडाळमध्ये व्हावे
यावेळी उपस्थितांनी कोकण रेल्वेच्या आराखड्यामध्येच कोकण रेल्वेचे रुग्णालय कुडाळ एमआयडीसीमध्ये प्रस्तावित आहे. त्यामुळे हे रुग्णालय कुडाळमध्येच व्हावे. तसेच हे रुग्णालय तत्काळ सुरू करायचे असल्यास कुडाळ ग्रामीण रुग्णालय किंवा येथील इंगेज रुग्णालयात सुरू करावे, यासाठी सर्वपक्षीय एकत्र येऊ, असे सांगितले.