कासार्डेजवळ अपघातात मुलीसह आईवडील जागीच ठार

By Admin | Updated: September 5, 2014 23:27 IST2014-09-05T23:06:38+5:302014-09-05T23:27:50+5:30

खासगी आरामबस-कारची समोरासमोर धडक : भरणीतील पाडावे कुटुंबावर काळाचा घाला; कारचा चक्काचूर

The girls were killed on the spot near Kasarde | कासार्डेजवळ अपघातात मुलीसह आईवडील जागीच ठार

कासार्डेजवळ अपघातात मुलीसह आईवडील जागीच ठार

नांदगाव, तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणवाडीनजीक आज, शुक्रवारी सकाळी १०.३०च्या सुमारास व्हॅगनर कार व खासगी आरामबस यांच्यात समोरासमोर धडक होऊन कणकवली तालुक्यातील भरणी येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला. गणेश पाडावे (वय ३८, मूळ गाव भरणी, ता. कणकवली, सध्या रा. जोगेश्वरी), पत्नी सायली पाडावे (३५) व मुलगी वेदश्री पाडावे (११) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची भीषणता इतकी होती की, व्हॅगनर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भरणी येथून मुंबईकडे व्हॅगनर कार (एमएच ०२ बीजी ७४०६) गणेश शामसुंदर पाडावे, तर मुंबईकडून कणकवलीकडे खासगी आरामबस (एमएच ०४ पीके ७५५६) सचिन विष्णू माने (रा. सातारा) हे घेऊन जात होते. त्यांच्यात महामार्गावरील कासार्डे ब्राह्मणदेव जवळील मेढादेव या ठिकाणच्या वळणावर समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर व्हॅगनरमधील सायली पाडावे या बाहेर फेकल्या गेल्याने त्यांना जोरात मार बसला, तर गणेश पाडावे व वेदश्री पाडावे गाडीतच अडकून / ाडल्याने जागीच मृत झाले. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने कासार्डे, तळेरे व नांदगावच्या ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर महामार्गावर सुमारे दीड तास एकेरी वाहतूक सुरू होती. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडलेला होता. व्हॅगनर गाडी पूर्णपणे तोडून अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रोहन रानमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे, कासार्डेचे आत्माराम गोसावी, चंद्रकांत झोरे, विजय खरात, तसेच आमदार प्रमोद जठार, पंचायत समितीचे सदस्य संजय देसाई, कासार्डेचे सरपंच संतोष पारकर, रज्जाक बटवाले यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ मदत केली. याठिकाणी सिंधुभूमी फाऊंडेशन कासार्डे, बाळा वळंजू मित्रमंडळ वारगाव, नांदगाव व फणसगाव येथील रुग्णवाहिका तात्काळ आल्या. (वार्ताहर)

...तर त्या वाचल्या असत्या
व्हॅगनरमधून बाहेर फेकल्या गेलेल्या सायली पाडावे यांना तत्काळ इमर्जन्सी १०८ रुग्णवाहिकेची मदत मिळाली असती, तर त्या कदाचित वाचल्या असत्या, असे उपस्थितांमधून बोलले जात होते. मात्र, १०८ ही रुग्णवाहिका इतर ठिकाणी गेल्याने तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही.

कुटुंबच उद्ध्वस्त झाले
कणकवली तालुक्यातील भरणी (घाडीवाडी) येथील पाडावे हे कामानिमित्त जोगेश्वरी येथे राहायला होते. काल, गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करून आज पुन्हा मुंबईला जायला निघाले असता कासार्डे येथे त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि पाडावे कुटुंबच उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ आहे.

Web Title: The girls were killed on the spot near Kasarde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.