भावी नगराध्यक्षपदासाठी ‘घमासान’
By Admin | Updated: October 30, 2015 22:49 IST2015-10-30T22:49:24+5:302015-10-30T22:49:24+5:30
प्र. ४ मध्ये टोकाची इर्षा : दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला

भावी नगराध्यक्षपदासाठी ‘घमासान’
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. ४ मध्ये दोन माजी सरपंचांमध्ये राजकीय अस्तित्वाची घमासान लढाई सुरू आहे. याठिकाणी काँग्रेसकडून संतोष नानचे तर भाजपाकडून राजेश प्रसादी निवडणूक लढवित आहेत. दोन्हीही मातब्बर उमेदवार असल्याने ‘काँटे की टक्कर’च्या या लढतीत तीव्र प्रचार आणि टोकाची इर्षा सुरू आहे. मतदानाचा दिवस जवळ येईल तशी येथील आक्रमकता वाढीस लागत आहे. संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या लढतीवर केंद्रित झाले आहे.
प्रभाग क्र. ४ मध्ये भोसले कॉलनीचा भाग समाविष्ट आहे. याठिकाणी मतदारांची संख्या १२६ एवढी असून, हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने येथे दोन माजी सरपंच निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून काँगे्रसच्या तिकिटावर संतोष नानचे, तर भाजपाच्या तिकिटावर राजेश प्रसादी निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे हे दोन्ही उमेदवार एकाच प्रभागात एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने याप्रभागाला टोकाच्या इर्षेला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही उमेदवार आपापल्या पक्षाचे भावी नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असल्याने भाजप आणि काँग्रेस या महत्वाच्या पक्षांचीही प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे.
संतोष नानचे हे गेली अडीच वर्षे सरपंच म्हणून कार्यरत होते. या आपल्या अल्प कालावधीत त्यांनी आपल्या प्रभागात बरीच विकासकामे केली. शिवाय शांत व संयमी स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तर राजेश प्रसादी गेली साडेसात वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यापैकी चार वर्षे ते सरपंचपदावर होते. अडल्या-नडलेल्यांंच्या मदतीला धावून जाणे आणि मदतीसाठी रात्री-अपरात्री येणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, सरपंच निवडीच्यावेळी झालेल्या राजकीय घडामोडींना वैतागून निराश झालेल्या प्रसादी यांनी पुढे भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे येथे त्यांना भाजपाने तिकीट दिले आहे. प्रभागात प्रचाराची रणधुमाळीही जोमात सुरू असून बाजू पटवून देण्यासाठीची दोन्ही उमेदवारांची रंगीत तालीम येथे पाहवयास मिळत आहे. काँग्रेस-भाजप या पक्षांनीही या प्रभागावर सावध नजर ठेवली आहे. राजकीय अस्तित्वासाठी व भावी नगराध्यक्षपदासाठी चाललेल्या या घमासान लढतीबद्दल संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागून आहे.