रानटी हत्तींपासून संरक्षण मिळावे
By Admin | Updated: November 22, 2014 00:11 IST2014-11-21T22:39:12+5:302014-11-22T00:11:59+5:30
वेताळबांबार्डेवासीयांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

रानटी हत्तींपासून संरक्षण मिळावे
सिंधुदुर्गनगरी : वेताळबांबार्डे परिसरात रानटी हत्तीच्या वावरामुळे तेथील ग्रामस्थ आणि शाळेतील मुले भयभीत झाली आहेत. वस्तीत येऊन हत्तींनी आतापर्यंत अनेकांना जखमी केल्याने हत्तीपासून वेताळबांबार्डेवासीयांना संरक्षण मिळावे, अशी मागणी वेताळबांबार्डे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वेताळबांबार्डे गावात रानटी हत्तींचा वावर वाढला आहे. भातशेती, माड बागायती नष्ट करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. सतत हत्तींचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना घराबाहेर पडणेही मुश्कील बनले आहे. आतापर्यंत गावातील अनेकांना हत्तीच्या हल्ल्यात सामोरे जावे लागले आहे. हत्तीच्या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. १९ नोव्हेंबर रोजी हत्तीच्या हल्ल्यात वेताळबांबार्डे गावातील ग्रामस्थ गायकवाड हे जबर जखमी झाले आहेत. सध्या ते गोवा बांबुळी येथे उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. येत्या आठ दिवसात यावर योग्य निर्णय न घेतल्यास २९ नोव्हेंबरपासून सर्व ग्रामस्थ शाळेतील मुलांना घेऊन मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबार्डे नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय गावसभेत घेतला आहे.
शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, सरपंच रोहिणी चव्हाण, उपसरपंच संतोष कदम, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत चव्हाण, माजी सरपंच हरिश्चंद्र कदम, वासू गावडे, शैलजा तावडे, दिलीप सावंत, संजना पाटकर, स्रेहा दळवी, एकनाथ भोगले, अशोक घोगळे, सुभाष सावंत, साजूराम नाईक, योगेश ठाकूर, प्रदीप गावडे, हंशराज चव्हाण आदींसह शाळेतील मुलांसह निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)