दोन तासात कणकवली गाठा, बक्षिस मिळवा
By Admin | Updated: September 23, 2016 00:40 IST2016-09-22T23:56:33+5:302016-09-23T00:40:20+5:30
खड्ड्यांवर अनोखी स्पर्धा : सहा नेत्यांना सहभागाचे आवाहन

दोन तासात कणकवली गाठा, बक्षिस मिळवा
सावंतवाडी : जनतेला विकासाच्या भुलभुलैया दाखवण्यापेक्षा पहिले जिल्ह्यातील रस्ते दुरूस्त करा, असे सांगत सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दोन तासात सावंतवाडीतून कणकवली गाठा आणि बक्षिस कमवा, अशी अनोखी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत फक्त शिवसेना भाजपमधील सहा प्रमुख नेत्यांनाच भाग घेता येणार आहे, अशी अट घातली आहे. ही स्पर्धा २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त आयोजित केली आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगेश तळवणेकर व भाई देऊलकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील जनतेला विकासाच्या भुलभुलैया दाखवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सी-वर्ल्ड, विमानतळ रेडी तसेच विजयदुर्ग बंदर आदी विकासकामे मार्गी लावण्याच्या मागे शिवसेना भाजपमधील नेते लागले आहेत. पण हा पर्यटन विकास करताना जिल्ह्यातील प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. मग या पर्यटन विकासाचा सामान्य जनतेला फायदा काय, असा सवालही त्यांनी केला आहे. जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग म्हणून खारेपाटणपासून बांद्यापर्यंत ओळखला जातो. मात्र हाच रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापासून खासदार विनायक राऊत यांनी प्रमुख महामार्ग गणेश चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त होईल, असे जाहीर केले होते. त्यासाठी प्लेवर ब्लॉकही टाकण्यात आले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच हे प्लेवर ब्लॉक उखडल्याने पुन्हा रस्ते खड्डेमय झाले आहेत.
महामार्गांवर एखादा अपघात झाला तर त्या रूग्णाला तातडीने गोवा बांबुळी येथे घेऊन जावे लागते. मात्र अनेकवेळा खड्डेमय रस्त्यांमुळे रूग्ण वाटेतच मृत होतात. एकतर सिंधुदुुर्गमध्ये मोठे रूग्णालय नाही मग निदान रस्ते तरी करा, अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठीच या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
२ आॅक्टोबरला महात्मा गांधी जयंतीबरोबरच लालबहादूर शास्त्री जयंती आहे. या दोन महापरूषांच्या जयंतीनिमित्त अनोखी स्पर्धा आयोजित होणार आहे. जो नेता सावंतवाडीतून कणकवलीत अवघ्या दोन तासांत जाईल त्यांच्यासाठी बक्षिसांची योजना आखली आहे. या स्पर्धेत शिवसेनेच्या तीन व भाजपच्या तीन अशा सहा नेत्यांना भाग घेता येणार आहे. यामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक तर भाजपमधील जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली यांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
कणकवली पटवर्धन चौकात करणार सत्कार
हे नेते सावंतवाडीतून दोन तासात कणकवलीत स्वत:च्या वाहनाने गेले, तर त्यांचा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर व भाई देऊलकर हे कणकवलीतील पटवर्धन चौकात खास सत्कार करणार आहेत. त्यामुळे या नेत्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन सावंतवाडीतून कणकवलीत जाण्यासाठी सामान्य माणसाला प्रवास करण्यासाठी किती वेदना सहन कराव्या लागतात, या वेदना नेत्यांनाही समाजाव्यात म्हणून ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे मंगेश तळवणेकर व भाई देऊलकर यांनी सांगितले आहे.