सर्वसाधारण सभेत खडाजंगी
By Admin | Updated: November 28, 2014 00:07 IST2014-11-27T22:38:25+5:302014-11-28T00:07:46+5:30
जान्हवी सावंत यांना इशारा : राणे यांना एकेरी बोलून दाखवाच

सर्वसाधारण सभेत खडाजंगी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सदस्य जान्हवी सावंत यांनी बुधवारी आमदार नीतेश राणे यांचा एकेरी शब्दात उल्लेख व अन्य बेताल वक्तव्य करून सभाशास्त्राचा भंग केला. सावंत अशा प्रकारची वक्तव्य करून फक्त प्रसिद्धी मिळवत आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यापेक्षा त्यांना ओव्हरस्मार्टगिरी करण्यास जास्त रस आहे. यामुळे हिंमत असेल तर आमदार राणे यांना एकेरी बोलून दाखवाच, असा खणखणीत इशारा समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी जान्हवी सावंत यांना दिला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत सदस्य जान्हवी सावंत यांनी जिल्हा परिषद वसाहत दुरूस्तीसंदर्भात बोलत असताना नीतेश राणे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तर तुम्हाला खाल्या मिठाची जाण नाही, अशाही प्रकारचे वक्तव्य केले होते. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली होती. या वक्तव्याचा सभापती अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला.
सभापती अंकुश जाधव म्हणाले, आमदार नीतेश राणे यांचा उल्लेख सावंत यांनी एकेरी नावाने केला. सावंत यांनी जाणीवपूर्वक हे विधान बोलले आहे. तसेच ‘खाल्या मिठाला जागलं पाहिजे’ या विधानासंदर्भात बोलताना जाधव म्हणाले, खाल्या मिठाला तुम्हाला जागलंच पाहिजे. ज्या पक्षात आपण काम करतो त्या पक्षाचे निष्ठेने काम केलेच पाहिजे. सावंत या शिवसेनेच्या मिठाला जागत नसल्या तरी त्या आमदार दीपक केसरकर यांच्या मिठाला जागत असल्याचा टोलाही जाधव यांनी लगावला.
सावंत यांचा केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप असून अशा प्रकारची विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहत आहेत. मी पूर्वी समजायचो की सावंत या अभ्यासू सदस्या आहेत. मात्र, तसे काहीही नसून त्यांना विकासकामांपेक्षा ओव्हरस्मार्टगिरीत जास्त रस आहे. सभागृहात काय बोलावे, काय बोलू नये याबाबत सावंत यांच्यावर संस्कार नाहीत.
सभाशास्त्र पायदळी तुडविण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोपही जाधव यांनी केला. यापुढे आमच्या एकाही आमदाराला एकेरी नावाने बोलाच मग कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही सावंत यांना दिला आहे. (प्रतिनिधी)