गायत्री वारेची चिपळुणात मिरवणूक एशियन स्पर्धेत यश
By Admin | Updated: November 23, 2014 23:51 IST2014-11-23T22:13:12+5:302014-11-23T23:51:08+5:30
सुवर्णकन्येला नागरिकांचा सलाम

गायत्री वारेची चिपळुणात मिरवणूक एशियन स्पर्धेत यश
चिपळूण : दक्षिण कोरिया येथे झालेल्या एशियन योगासन स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळविणारी पेढे परशुरामची सुकन्या गायत्री वारे हिचे शनिवारी दुपारी १.३० वाजता वालोपे रेल्वे स्टेशन येथे आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. गायत्री हिने योगासनचे धडे कोवॅस व्यायामशाळेत घेतले असून, पेढे येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी आहे. सध्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालयात ती शिकत आहे. आजपर्यंत तिने शालेय स्तरापासून विविध स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. दक्षिण कोरियात झालेल्या एशियन स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी केली आहे. त्याबद्दल वालोपे रेल्वेस्थानक येथे तिचे आगमन होताच कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम, नगरसेवक सुचय रेडीज, डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम जोशी, बाबू तांबे, रवींद्र तांबिटकर, मंगेश मुरकर, आर. जी. कुलकर्णी, संतोष जाधव, मुनावर चौगुले, अख्तर मुकादम, अशोक कदम आदींसह वालोपे, कळंबस्ते, पेढे ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी डी. बी. जे. महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. गायत्री हिला कोवॅस संस्थेच्या अध्यक्ष सुमती जांभेकर यांचे मार्गदर्शन लाभले असून, संस्थेतर्फेही तिचा सत्कार करण्यात आला. एशियन योगासन स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. सायंकाळी शहरातून गायत्री हिची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये आर. सी. काळे विद्यालयातील विद्यार्थिनी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)