जठार-रावराणे वादामुळे घुसमट

By Admin | Updated: August 1, 2014 23:19 IST2014-08-01T21:37:52+5:302014-08-01T23:19:48+5:30

भाजप कार्यकर्त्यांची स्थिती : पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष

Gautar-Raavarna Vaamat Intussat | जठार-रावराणे वादामुळे घुसमट

जठार-रावराणे वादामुळे घुसमट

प्रकाश काळे - वैभववाडी ,, भाजपाचे आमदार प्रमोद जठार आणि जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांच्यातील वादात सामान्य कार्यकर्त्यांची चांगलीच घुसमट होत आहे. चार वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्यातील वादावर तोडगा काढण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले नाही की हा वाद धुमसत रहावा ही त्यांचीच इच्छा आहे? याचाही उलगडा झालेला नाही.
विधानसभा निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली असल्याने पक्षश्रेष्ठी आमदार जठार- रावराणे यांचे मनोमिलन घडवून पक्षाचे संभाव्य नुकसान टाळणार की त्यांच्यातील विसंवादाकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांसमोर अडचणी वाढवणार यावर वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण कणकवली मतदारसंघातील मतांचे गणित ठरणार आहे. २००८ च्या एप्रिलमध्ये जिल्ह्याच्या राजकीय क्षितीजावर प्रमोद जठार मुंबईतील उद्योगपती म्हणून अवतरले. तेव्हा कणकवली आणि वैभववाडीतील भाजप १० ते १५ कार्यकर्त्यांची होती. जठार यांची भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाली त्याच दिवशी प्रमोद रावराणेंची वैभववाडी अध्यक्ष म्हणून जठार यांची भेट झाली. त्यावेळी झालेल्या संवादातून जठार रावराणेंवर प्रभावित झाले. मग सव्वा वर्षाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा तालुक्याचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन प्रमोद जठार यांच्यासाठी प्रमोद रावराणे संघटना बांधणीत गुंतले. विधानसभेला जठार निवडूनही आले. मात्र, त्यानंतर झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जठार यांनी मदत केली नसल्याचा समज झाल्याने रावराणे यांनी जठार यांच्यापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली. रावराणेंच्या या अलिप्ततेवर जठार, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी थेट भाष्य टाळले. मात्र काळसेकर यांची रावराणेंच्या अलिप्ततेला मूक संमती होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार विनोद तावडे, बाळ माने, माधव भंडारी यांच्याकडेही जठार- रावराणेंच्या विसंवादाबाबत चर्चा झाली. मात्र, त्यातून मार्ग निघाला नाही. जिल्हा सरचिटणीस म्हणून तालुक्याबाहेर सक्रीय असणारे रावराणे म्हणतात, गेल्या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांचे उत्तर काय देणार? तर जठार सांगतात, ‘प्रमोद’ जवळ येतच नाही. या परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुरूवातीला रावराणेंना साथ देणारे जिल्ह्याचे काही पदाधिकारी आता जठार यांच्यासोबत जुळवून घेत आहेत. हेही रावराणेंना पटलेले दिसत नाही. तालुक्यात भाजपाला जेवढी जठार यांची गरज आहे तेवढीच प्रमोद रावराणेंची आहे. रावराणेंनी आपल्या जागेतील भाजप कार्यालय स्थलांतर करायला लावून तेथे स्वत: कार्यालय सुरू केले. त्याचप्रमाणे नवीन संपर्क कार्यालयात अद्याप पाऊलही ठेवलेले नाही. त्यामुळे कार्यकर्र्त्यामध्ये उलट-सुलट चर्चा होत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था
आमदार जठार यांच्या दौऱ्यावेळी प्रमोद रावराणे तालुक्याबाहेर किंवा घरी थांबणे पसंत करतात. स्थानिक कार्यकर्त्यांना जठार यांच्यामुळे मानसन्मान आणि भाजप कार्यकर्ता म्हणून ओळख मिळाली. परंतु कार्यकर्त्यांच्या वेळप्रसंगाला प्रमोद रावराणे धावून जातात. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या लेखी दोघांचेही महत्त्व सारखेच आहे. मात्र जठार- रावराणे यांच्यातील विसंवाद कार्यकर्त्यांसमोर अनेकदा अडचणीचा ठरत आहे. वर्षातून एखाददुसरी वेळ अनपेक्षितपणे एकमेकांना कवटाळताना दिसतात. कालांतराने पुन्हा परस्पर टाळतात. त्यामुळे आपण नेमके कोणाचे ऐकावे आणि काय करावे, याबाबतची भूमिका स्पष्ट होत नसल्याने सामान्य भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती पहायला मिळत आहे.

जठार-रावराणे दरी वाढता वाढे
--वैभववाडी तालुक्यात सर्वार्थाने काँगे्रस भक्कम असताना येथे रावराणेंनी मेहनत घेतली.
---जठार यांचे उपक्रम आणि स्वत:च्या संघटन कौशल्यातून नवख्या कार्यकर्त्यांची फळी उभी केली.
-- कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली.
--त्यानंतर आमदार जठार व रावराणे यांच्यात वितुष्ट यायला सुरूवात झाली होती.
--त्या निवडणुकीत जठार यांनी शक्य असूनही आपणास मदत केली नाही, असा समज झाला.
--त्यानंतर रावराणे यांनी दूर राहण्यास सुरूवात केली.

Web Title: Gautar-Raavarna Vaamat Intussat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.