गणेश चित्रशाळांमध्ये दिवसरात्र गजबज
By Admin | Updated: September 7, 2015 23:23 IST2015-09-07T23:23:07+5:302015-09-07T23:23:07+5:30
मूर्तिकार व्यस्त : वाढत्या महागाईचा सर्वांनाच बसतोय फटका

गणेश चित्रशाळांमध्ये दिवसरात्र गजबज
निकेत पावसकर -- नांदगांव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेले असून दिवसरात्र गावागावातील गणेशशाळा गजबजू लागल्या आहेत. पिढ्यानपिढ्या गणेशमूर्ती घडविणारे मूर्तीकार आता गणरायाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत.कोकणात परंपरागत गणेशमूर्ती घडविणारे अनेक कलाकार आहेत. आपली पिढीजात कला आजही टिकवून ठेवलेली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चांगले मूर्तिकार यानिमित्ताने असल्याचे दिसून येते. आपल्या कुंचल्यातून सुंदर गणेशमूर्ती घडविण्याचे काम अनेक वर्षे करताना दिसतात. केवळ एक कला, मानसिक समाधान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला जोपासली गेली पाहिजे यासाठीच ही परंपरागत कला चालू ठेवल्याचे सांगितले जाते. आपण व्यवसाय म्हणून याकडे न पाहता कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेने हा व्यवसाय करीत असल्याचे ग्रामीण भागातील अनेक मूर्तिकार सांगतात.कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकारांकडे किमान ५० ते ६० विविध आकारातल्या मातीच्या गणेशमूर्ती असतात. या गणेशोत्सवाची चाहूल किमान दोन महिने पूर्वीपासून लागते. कोकणातील अनेक ठिकाणी भजनांचे सूरही या दरम्यान ऐकू येतात. काही ठिकाणी कागदाच्या लगद्यापासूनही गणेशमूर्ती बनविल्या जातात. पर्यावरणप्रेमी तर वर्षानुवर्षे अशाचप्रकारची गणेशमूर्ती आणतात. इथले गणेश मूर्तिकार काही वर्षांपूर्वी पिवळ्या चिकट मातीपासून गणेश मूर्ती बनवायचे. त्यावेळी मात्र खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचेही वयोवृद्ध मूर्तिकारांकडून सांगण्यात येते. त्यावेळी त्या मातीला पर्यायच नव्हता. तर अलिकडच्या काळात त्या मातीऐवजी पेणला मिळणारी राखाडी माती अनेकजण मागवतात. ती तयार माती येत असल्यामुळे मूर्ती घडवायला सहज सोपे जाते. ही कला जोपासताना मात्र दरवर्षी वाढीव किंमतीलाही सामोरे जावे लागत आहे. वाढणारी महागाई यामुळे ही कला जोपासणे अत्यंत जिकिरीचे झाले असल्याचेही अनेकजण बोलून दाखवितात. या गणेशमूर्ती साकारताना मूर्तिकारांचे कसब लागते. त्यात त्यांची जबाबदारी वाढलेली असते. कोकणातल्या या गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणचे चाकरमानी आवर्जून येतात. मात्र, ग्रामीण भागात अजूनही वेगवेगळ्या कारणांसाठी अक्षरश: कसरतच करावी लागत असून आमची ही कला भविष्यातही जिवंत रहावे यासाठीच ही कारागिरी सुरु असल्याचे सांगतानाच यात मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे आहे. दरवर्षी माती, रंगाचे वाढलेले दर शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी व गणेशमूर्तीमधून मिळणारी रक्कम याचा मेळच बसत नसल्याचेही सांगितले जाते.