गणपत कदम-सुभाष बने शिवसेनेच्या वाटेवर?
By Admin | Updated: July 25, 2014 00:03 IST2014-07-25T00:01:04+5:302014-07-25T00:03:28+5:30
काँग्रेसमध्ये दोघेही नाराज : दोघांच्याही भुमिका गुलदस्त्यात

गणपत कदम-सुभाष बने शिवसेनेच्या वाटेवर?
रत्नागिरी : पक्षामध्ये आलेली अस्वस्थता आणि पक्षाकडून होणारा अन्याय यामुळे राजापूरचे माजी आमदार गणपत कदम आणि संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने हे दोघेही कट्टर राणेसमर्थक लवकरच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे वृत्त आहे. हे दोन्ही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांनी मात्र अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राणे यांच्या सर्वांत जवळच्या रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता रत्नागिरी जिल्ह्यातील दोन खंदे राणे समर्थक मानले जाणारे गणपत कदम आणि सुभाष बने हेही शिवसेनेच्याच वाटेवर असल्याची चर्चा आहे.
१९९९ साली गणपत कदम शिवसेनेकडून राजापूरचे आमदार झाले. २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर गणपत कदम आणि सुभाष बने या दोघांनीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पोटनिवडणुकीत गणपत कदम यांनी विजय मिळविला. मात्र, २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता आपण निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीरही केले. मात्र, नंतरच्या काळात पक्षाकडून त्यांना कुठलेही मानाचे पद मिळाले नाही. त्यापाठोपाठ त्यांच्या मतदारसंघात इच्छुकांची यादी वाढत गेली आहे.
कदम यांनी आतापर्यंत राणे यांच्या पाठीशी उभे राहूनच आपली वाटचाल केली आहे. आता राणे यांनीच काँग्रेसच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भविष्यात पक्षात पुढे येण्याची आपल्याला काहीच संधी मिळणार नाही, या विचारातून गणपत कदम यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. याचे सूतोवाच त्यांनी आज, गुरुवारी राजापूरमध्येच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत केले आहे. आपण लवकरच काँग्रेस सोडणार असल्याची माहिती गणपत कदम यांनी आपल्या काही जवळच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
सुभाष बने यांची नाराजी तर त्याहून अधिक आधीची आहे. राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी शिवसेनेची आमदारकी सोडली. तेही पोटनिवडणुकीत विजयी झाले; पण २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. संगमेश्वर तालुक्याचा बराचसा भाग चिपळूण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला असल्याने बने यांना निवडणूक लढविताच आली नाही.
मतदारसंघ गमावल्याने विधान परिषदेवर वर्णी लावण्याचे आश्वासन बने यांना मिळाले होते; मात्र कोणत्याही राणेसमर्थकाला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नाही. त्यातही बने मागे पडले. तेव्हापासून ते नाराजच होते. नारायण राणे यांच्या कार्यक्रमांमधील त्यांचा सहभागही कमी होऊ लागला होता. ते काँग्रेसमधून बाहेर पडणार, अशी शक्यता तेव्हाच निर्माण झाली होती. मात्र, राणे यांनी त्यांना थोपवून धरले होते.
आता कदम आणि बने या दोघांनीही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. येत्या पंधरवड्यात या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या दोन्ही नेत्यांनी शिवसेना प्रवेश किंवा त्यादृष्टीने आपली भूमिका अधिकृतपणे अजून कोठेही मांडलेली नाही. (प्रतिनिधी)