कार्यसिद्धीप्राप्तीचा आनंदच मूर्तिकारांची प्रेरणा
By Admin | Updated: August 28, 2016 00:24 IST2016-08-28T00:24:03+5:302016-08-28T00:24:03+5:30
गणेश मूर्ती, कलाकुसरीचा अनमोल ठेवा : अनेक समस्यांच्या विळख्यातही भक्तिभावाची जोपासना

कार्यसिद्धीप्राप्तीचा आनंदच मूर्तिकारांची प्रेरणा
राजन वर्धन ल्ल सावंतवाडी
गणेशोत्सवाची कोकण परंपरा देशात नावाजण्याच्या विविध कारणांपैकी एक म्हणजे इथली मूर्ती निर्मितीची कलाकुसर होय. प्लास्टर आॅफ पॅरिसला बगल देत व जुन्या परंपरेत आवश्यक तेवढेच बदल करीत मूर्ती साकारण्याच्या पद्धतीमुळे मूर्तिकारांची कला इथल्या जनसामान्यांच्या मनात घर करून आहे. महागाईचा चटका सहन करीतही येथील मूर्तिकारांचे दर मर्यादित आहेतच; त्याचबरोबर आपल्या हातांच्या कलेतून साकारणारी मूर्ती भाविकांच्या घर-मंदिरात आणि प्रत्येकांच्या हृदयात अनमोल ठेवा बनते, हाच परमोच्च आनंद मानून येथील मूर्तिकला आत्मीयतेने जोपासली जाते.
भाविकांनीही महागाईचा कसलाच डांगोरा न पिटता या कलेला आपली संस्कृती म्हणून जोपासली आहे. परिणामी कोकणच्या गणशोत्सवाच्या अखंडित पंरपरेतील मूर्तिकारांचे स्थानही अनमोल राहण्यास या गोष्टीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वर्षातील गणेशोत्सवाची धूम साजरी करण्यासाठी लहान-थोरांपासून वयोवृद्धांपर्यंत पंधरवडाभर रेलचेल सुरू असते. घरातील मूर्ती आणण्यासाठी तर चैतन्यमय वातावरणाने प्रत्येकाचे मन हर्षित झालेले असते. मूर्ती म्हणजे घरातील मांगल्य, अशीच भावना एकवटलेली असते. त्यामुळे या उत्सवात मूर्तिकारांनाही विशेष महत्त्व असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती आजही परंपरागत पद्धतीनेच बनविल्या जात असून, येथील मूर्तिकारांनीही त्याच पद्धतीचा अखंडित वारसा जोपासला आहे. मोठमोठ्या शहरात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींनी गणेशाच्या उत्सवाला प्रदूषणाची झळ बसली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी या मंगलमय सणाला केवळ जल्लोषाची परंपरा निर्माण झाल्याने उत्सवात श्री गणेशाचे नाममात्र प्रेम उरले आहे. पण, अशा विघातक आणि गंभीर गोष्टीला बगल देत कोकणातील गणेश उत्सवातील मूर्तिकला थाटात आणि डौलात आपली पंरपरा कायम पाहावयास मिळते.
जिल्ह्यातील मूर्तिकार शाडूच्याच मूर्ती निर्मितीवर आपला भर कायम ठेवून आहेत. धार्मिक भावना दुखावू नयेत, या एकमेव हेतूने ही मूर्ती निर्मितीची कला इथे जोपासली जातेय. मूर्ती निर्मितीच्या मातीचा तसेच वाहतुकीचाही दर वाढला आहे. आवश्यक रंगाचीही किंमत वाढली आहे. शिवाय मजुरांची घटलेली संख्या आणि मजुरीचे वाढलेले दर या व अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी मूर्ती निर्मितीला महागाईचा फटका बसत आहे. तरीही महागाईची झळ सोसत कला अखंडित जोपासत जिल्ह्यातील मूर्तिकारांनी आपले ‘श्री’ प्रेम दर्शवीत आपला वारसा अखंड पेलला आहे.
आजही स्वत: मूर्ती निर्मितीवर येथील मूर्तिकारांचा भर असल्याचेही प्रकर्षाने जाणवते. दरम्यान, मागील काही वर्षांत तयार मूर्ती आणून त्या रंगवून बाजारात विक्री करण्यावर भर देणाऱ्या अनेक व्यावसायिकांना, भाविकांनीही काही काळानंतर नाकारले होते. परिणामी हा प्रकार आता बंद झाल्याचे चित्र असून, स्वहस्ते मूर्ती निर्मितीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. भाविकही आपली मूर्ती मूर्तिकारानेच स्वहस्ते बनविण्यावर ठाम असतात. आपल्या मूर्तीला यंत्राने तयार करण्यापेक्षा जिवंत हाताने तयार झालेली मूर्ती भाविकांना आपला आनंद द्विगुणीत करणारा असतो.