मिनी पर्ससीन नेटधारकांचा मोर्चा
By Admin | Updated: November 17, 2015 00:02 IST2015-11-16T21:36:08+5:302015-11-17T00:02:21+5:30
विविध मागण्या : मत्स्य व्यवसाय संचालक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मिनी पर्ससीन नेटधारकांचा मोर्चा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी पर्ससीन नेट नौकामालकांवर अन्याय होत असल्याने सोमवारी सकाळी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर मिनी पर्ससीन नेट मच्छिमार मालक संघटनेने मोर्चा काढला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन सहाय्यक मत्स्य व्यवसाय उपसंचालक ना. वि. भादुले यांना देण्यात आले.याप्रसंगी मिनी पर्ससीन नेट संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार बाळ माने, सल्लागार अविनाश ऊर्फ भाऊ शेट्ये, अध्यक्ष निसार इक्बाल वस्ता, उपाध्यक्ष उदय सुरेश पाटील, उपसेक्रेटरी विलास फझल सोलकर आदी उपस्थित होते.आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मिनी पर्ससीन नेट नौकामालकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेऊन मिनी पर्ससीन नेट मच्छिमार मालक संघटनेची स्थापना केली आहे. जिल्ह्यात मिनी पर्ससीन नेटधारकांच्या सुमारे १२५ नौका आहेत. या नौकांना मर्चंट शिपिंग अॅक्ट १९५८ अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि फिशिंग पास मिळवण्यासाठी नौका मालकांनी मत्स्य विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव मे २०१४ पासून मत्स्य विभागाकडे पडून आहेत. त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मत्स्य विभागाकडून गेले वर्षभर निव्वळ टाळाटाळ करण्यात येत आहे. याचा विभागाकडून गेले वर्षभर निव्वळ टाळाटाळ करण्यात येत आहे.त्याचा निषेध करण्यासाठी मिनी पर्ससीन नेटमालकांच्या संघटनेतर्फे सोमवारी मिरकरवाडा जेटीवरुन मत्स्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेटमालकांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)
पर्ससीनमुळे गरजेपेक्षा जास्त मासेमारी होत आहे. त्यामुळे २०१२नंतरच्या मिनी पर्ससीन नेटलाच नाही तर कोणत्याही पर्ससीन नेटला परवाना न देण्याचा शासनाचा आदेश आहे. जिल्हाभरातून फायबर बोटीसाठी ४७ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी ७ व्ही. आर. सी. मान्य आहेत. २० प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे. याची माहिती बोटमालकांना देण्यात आली आहे, तर २० मिनी नेटपर्ससीनचे प्रस्ताव बोटमालकांना परत केले आहेत.
- ना. वि. भादुले, उपसंचालक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय